सांगली : कोयना धरणातून विसर्ग वाढविल्याने सांगली शहरातील पूरग्रस्त धास्तावले आहेत. पाणी ओसरले म्हणून घरी परतलेले अनेक नागरिक महापालिकेच्या सूचनेनंतर पुन्हा निवारा केंद्रात परतले आहेत. सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी ४२ फुटांवर जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केल्याने शहरातील पूर ओसरलेल्या भागांत पुन्हा पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सांगली शहरातील अनेक भाग गेल्या दोन दिवसांत पुराच्या विळख्यातून सुटले आहेत. घरे, दुकाने यांच्या स्वच्छतेची कामेही अद्याप सुरू आहेत. अशा स्थितीत धरणांतून विसर्ग वाढल्याने व नदीपातळीत पुन्हा वाढ होणार असल्याने सांगलीतील पूरग्रस्त धास्तावले आहेत. ज्या भागांत पाणी ओसरले आहे, अशा काही भागांमध्ये पुन्हा पुराचे पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेकडून पूरग्रस्तांना निवारा केंद्रात थांबविण्यासाठी प्रयत्न करावे लागले.
चौकट
या भागांतील नागरिकांना सूचना
महापौर दिग्विजय सूर्यवंशी व राष्ट्रवादीचे नेते शेखर माने यांनी गुरुवारी पूरग्रस्त भागात जाऊन नागरिकांना निवारा केंद्रातच थांबण्याची सूचना केली. सूर्यवंशी प्लाॅट, इनामदार प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, शिवशंभो चौक, दत्तनगर, काकानगर, साईनाथनगर, कृष्णामाईनगर, जुना बुधगाव रस्त्यावरील राजीव गांधी झोपडपट्टी, वाल्मिकी आवास, वखारभाग परिसरातील लोणी गल्ली, शामरावनगर परिसरातील रुक्मिणीनगर, विठ्ठलनगर, सहारा कॉलनी, कोल्हापूर रोडवरील रामनगर, काळीवाट, आदी भागांत पाहणी करून नागरिकांना सूचना देण्यात आल्या.
चौकट
व्यापारी पेठेतही सतर्कता
सांगलीच्या मारुती रोडवरील व्यापाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून दुकानांची स्वच्छता केली आहे. अशा परिस्थितीत ड्रेनेजचे बॅकवॉटर आनंद चित्रमंदिरापासून मारुती चौकापर्यंत येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांना दुकानात आताच माल न लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
चौकट
पाणी इशारा पातळीच्या खाली
सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी सध्या ३७ फुटांवर असून पाणी इशारा पातळीच्या खाली आहे. ४२ किंवा ४३ फुटांवर पाणी गेले तर पुराचे पाणी पुन्हा अनेक भागांना कवेत घेण्याची शक्यता आहे.
चौकट
भरपाईच्या घोषणेने गोंधळ
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी मदतीची घोषणा केल्याने व पंचनामे सुरू झाल्याने निवारा केंद्रांतील अनेक लोक दिवसभर पंचनाम्याच्या शक्यतेने पूरग्रस्त घरातच थांबत असल्याचे दिसत आहे.