सांगली : जिल्ह्यात तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा लम्पी स्कीनच्या आजाराची एंन्ट्री झाली आहे. मिरज, कवठेमहांकाळ, वाळवा, जत तालुक्यांतील जनावरे बाधित झाली आहेत. दोन वर्षांपूर्वी आलेल्या लाटेत तब्बल साडेसातशे जनावरे मृत्युमुखी पडली होती. पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण करण्यात आले आहे, मात्र उपाययोजनांनंतरही संसर्ग होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.मागील तीन महिन्यांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असली, तरी काही भागात रिमझिम पाऊस सुरूच आहे. दलदल, डासांची पैदासामुळे लम्पी स्कीनने पुन्हा डोके वर काढले आहे. गाय, बैल, वासराला लम्पीची लागण होते. म्हशींच्या तुलनेत गायवर्गीय प्राण्यात रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने लागण लवकर होते. हा चर्मरोग असला, तरी संसर्गाने झपाट्याने पसरतो.मिरज, वाळवा, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील हजाराहून अधिक जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. मात्र, पशुसंवर्धन विभागाकडून अद्याप नोंदणी करण्याबाबतच्या सूचना नसल्याने आकडेवारी समोर येत नसल्याचे स्पष्ट झाले. या तालुक्यातील सर्व जनावरांना लसीकरण केले, तरी काही जनावरांना नव्याने लागण झाली. याचा फटका दूध उत्पादनावरही होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. लम्पी त्वचारोगाच्या लक्षणांमध्ये ताप, डोळे आणि नाकातून स्त्राव, जास्त लाळ, पशुंच्या शरीरावर फोड येणे आणि दुधाचे उत्पादन कमी होणे, अशी लक्षणे दिसून येतात.
लक्षणे दिसताच उपचार करून घ्या : थोरेजिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण झाले आहे, पण काही तालुक्यांत काही जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. बाधित जनावराला चांगल्या जनावरापासून अलगीकरणात ठेवावे. प्राथमिक लक्षणे दिसताच स्थानिक पशुसंवर्धन दवाखान्यात उपचार करून घ्यावेत, असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी केले आहे.