दिघंची : पुजारवाडी-दिघंची (ता. आटपाडी) येथे दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्राम आपत्ती व्यवस्थापन समिती आता कागदावरच उरली आहे. रविवारी एकाच दिवशी पांढरेवाडी येथील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे, तर पुजारवाडी पांढरेवाडी भवानीमळा या परिसरात एकाच कुटुंबातील अनेकजण कोरोनाबाधित होत आहेत.
कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या भागात मिनी कंटेन्मेंट झोन करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
होम क्वारंटाईन असलेले कोरोनाबाधित रुग्ण घराबाहेर पडत असल्याने कोरोनाचे संक्रमण या परिसरात वाढत आहे. प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आतापर्यंत पुजारवाडी पांढरेवाडी या भागात दुसऱ्या लाटेत पुरुष ३१ व स्त्रिया २३ असे एकूण ५४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. अडीच हजार लोकसंख्या असलेल्या गावात लोकसंख्येच्या मानाने रुग्णसंख्या जास्त आहे, तर बाहेर मोकाटपणे फिरणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे संख्या वाढत आहे. फिरणाऱ्या कोरोनाबाधितांमुळे कोरोनाची साखळी तुटणार कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोट
पुजारवाडी पांढरेवाडी भवानीमळा या परिसरातील कोरोनाबाधित रुग्ण बाहेर फिरत असतील, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील.
- सचिन मुळीक, तहसीलदार
कोट
आटपाडी
पुजारवाडी ग्रामपंचायतीकडून कोरोनाबाधित रुग्णांच्या घरी औषध फवारणी केली आहे. आरोग्यसेवक, आशा वर्कर्स यांच्यामार्फत कोरोनाबाधित रुग्णांची दररोज तपासणी केली जाईल व पुजारवाडी गावात लसीकरणाची सोय करणार आहे.
- अनिता होनमाने
सरपंच, पुजारवाडी दिघंची