सांगली : महापुराच्या तडाख्यात संपूर्ण बाजारपेठ सापडली असताना, शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या सांगली जिल्हा नगरवाचनालयातील ५0 हजार पुस्तके भिजून नष्ट झाली आहेत. फर्निचर,खुर्च्या, पुस्तके मिळून २५ ते ३0 लाखाचे नुकसान झाले आहे.
सांगलीतील २00५ चा महापूर लक्षात घेतल्यान अनेकांची फसगत झाली. यामुळे अनेकांनी घरे सोडली नाहीत. व्यापारी पेठांमधील साहित्यही यामुळे उद्ध्वस्त झाले. अनेक घरे पडली. राजवाडा चौकातील नगरवाचनालय यावर्षी शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे. दीडशेवे वर्ष विविध कार्यक्रमांनी साजरे होत आहे. या वर्षाची सांगता होत असतानाच या महापुराने होत्याचे नव्हते करून टाकले.
महापुरात नगरवाचनालयाची मोठी हानी झाली. वाचनालयातील ५0 हजाराहून अधिक पुस्तके पूर्णपणे भिजली आहेत. कर्मचाऱ्यांनी एखादा कचरा भरावा, तशी भिजलेली पुस्तके बाहेर आणून टाकली. जो कचरा म्हणूनच टाकला जाणार आहे. जुने ग्रंथही या महापुरात नष्ट झाले. फर्निचर, खुर्च्या, संगणकही नष्ट झाले आहेत. वाचनालयात महापुराचे पाणी तब्बल दहा फुटावर खेळत होते. यामुळे वाचनालयातील फर्निचर, खुर्च्या पाण्याच्या वेगाने फिरत होत्या.
वाचनालयाचे कार्यवाह अतुल गिजरे म्हणाले की, वाचनालयातील अनमोल ग्रंथसंपदा नष्ट झाली आहे. मूळ पदावर यायला किमान तीन-चार महिने लागतील. मोठे नुकसान झाले आहे. महापुराने सांगलीच्या नगर वाचनालयाचे मोठे नुकसान झाले आहे. इमारतीच्या तळमजल्यार असलेली तब्बल पन्नास हजारावर पुस्तके भिजली आहेत. सध्या इमारतीच्या दुसºया मजल्यावरील सभागृहात ही पुस्तके वाळविण्याचे काम सुरू आहे.