विटा : प्रेमसंबंधाची माहिती वडिलांना सांगण्याची धमकी दिल्याने सराफ व्यावसायिकाने विवाहित प्रेयसीचा ओढणीने गळा आवळून खून केला. तिचा मृतदेह भिकवडी खुर्द (ता. खानापूर) येथील येरळा नदीपात्रात टाकल्याचे महिन्यानंतर मंगळवारी उघडकीस आले. ताई सचिन निकम (३२, मूळ बलवडी, खा., सध्या रा. शाहूनगर, विटा) असे मृत विवाहितेचे नाव असून, तिचा प्रियकर राहुल सर्जेराव पवार (३१, मूळ वासुंबे, ता. खानापूर, सध्या रा. सावरकरनगर, विटा) याला पोलिसांनी अटक केली.राहुल पवार याचे विट्यात रेणुका ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे, तर ताई निकम हिच्या पतीचा विट्यात भेळ विक्रीचा गाडा आहे. ती हॉटेलमध्ये भाकरी बनवण्याचे काम करीत होती. राहुल व ताई यांच्यात प्रेमसंबंध होते. दि. ३ मे रोजी तिने स्वत:च्या वाढदिवसाला राहुलकडे एक ग्रॅम सोन्याच्या अंगठीची मागणी केली. त्याने अंगठी न दिल्याने तिने प्रेमसंबंधाची माहिती तुझ्या वडिलांना सांगेन, अशी धमकी दिली.दि. ५ मे रोजी रात्री आठ वाजता राहुलने मित्राची मोटार घेऊन तिला मोटारीत घेतले. कडेगाव, सैदापूर, शामगाव घाट, चोराडेकडे त्याने मोटार नेली. तेथून पुन्हा विट्याकडे येत असताना ढाणेवाडीच्या हद्दीत मोटार रस्त्याच्या बाजूला थांबवली. प्रेमसंबंधाची माहिती वडिलांना देण्याची धमकी दिल्याच्या रागातून त्याने तिच्या गळ्यातील ओढणीने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह मोटारीतून भिकवडी खुर्द हद्दीत येरळा नदीच्या पुलावरून पाण्यात टाकून तेथून पलायन केले.दरम्यान, तिच्या नातेवाईकांनी विटा पोलिसांत ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. मंगळवारी (दि. १४ जून) सकाळी भिकवडी खुर्दच्या पोलीस पाटलांनी येरळा नदीपात्रातील पाण्यावर महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह तरंगत असल्याची माहिती कडेगाव पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पंचनामा केला. बेपत्ता नोंदीच्या वहीवरून तपास केला असता हा मृतदेह विटा येथील ताई निकमचा असल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी तिचे मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासले असता राहुल पवार याचा शोध लागला. पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने ताई निकमच्या खुनाची कबुली दिली. त्याला पोलिसांनी अटक केली.
सोन्याच्या अंगठी न दिल्याने प्रियकराला दिली धमकी, प्रेयसीचा ओढणीने गळा आवळून केला खून
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 1:03 PM