सांगली : सातत्याने प्रयत्न करूनही सैन्य दलात नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्येतून इटकरे (ता. वाळवा) येथील अनिल कुंभार (वय २५) याने सांगलीत स्टेशन चौकात दूरसंचार कार्यालयाच्या आवारातील सहाशे फूट टॉवरवर चढून आत्महत्येची धमकी दिली. सोमवारी भरदिवसा त्याचा हा पाच तास थरार सुरू राहिला. अग्निशमन दलाचे अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी नोकरीचे आश्वासन दिल्यानंतर तो टॉवरवरून खाली उतरला आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.अनिल गेल्या पाच वर्षांपासून सैन्य दलात नोकरीसाठी प्रयत्न करीत आहे. पण त्याला प्रत्येक भरतीत अपयशच पदरात पडले. तो कला शाखेचा पदवीधर आहे. पदवी असूनही कुठे नोकरी मिळत नसल्याने तो गेल्या काही दिवसांपासून नाराज होता. यातून सोमवारी त्याने थेट सांगली गाठली. सकाळी अकरा वाजता त्याने सर्वांची नजर चुकवून टॉवरवर चढण्यास सुरुवात केली. तब्बल सहाशे फूट उंचीच्या टॉवरवर जाऊन तो उभा राहिला. पण कोणाचीही त्याच्यावर नजर गेली नाही. सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्याने टॉवरचे स्पेअरपार्ट व नटबोल्ट व लोखंडी अँगल खाली टाकले. तरीही कोणाचे लक्ष गेले नाही. शेवटी त्याने स्वत: मोबाईलवरून महापालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी एस. एस. देसाई यांच्याशी संपर्क साधून टॉवरवर चढल्याची माहिती दिली.अग्निशमनचे पथक तातडीने दाखल झाले. तो सहाशे फुटावर होता. अनेकांना तो दिसतही नव्हता. त्यानंतर शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन व पोलिसांनी त्याच्याशी मोबाईलवरच संपर्क साधून खाली उतरण्याची विनंती केली; पण त्याने ‘मला नोकरीचे पत्र मिळाल्याशिवाय खाली उतरणार नाही’, अशी भूमिका घेतली. त्याची समजूत काढताना अधिकाºयांना तारेवरची कसरत करावी लागली. क्रेन किंवा ड्रोन ही साधने आणूनही कुंभारला खाली उतरवणे शक्य नव्हते. अधिकाºयांनी त्याला नोकरीची हमी दिली. त्यानंतर त्याने खाली उतरण्याची तयारी दर्शविली. तब्बल पाच तास हा थरार सुरू होता.नातेवाईकांना बोलाविलेकुंभार खाली येत नसल्याचे लक्षात येताच पोलिसांनी इटकरे गावी त्याच्या घरच्यांशी संपर्क साधला. त्याची आई व भाऊ घटनास्थळी आले. पोलिसांनी त्यांची मदत घेऊनच कुंभारला कसेबसे टॉवरवरुन खाली उतरण्यास भाग पाडले. त्याचे वडील लष्करात होते. २०१३ मध्ये त्यांचे निधन झाले आहे. सोमवारी तो सांगलीत सैनिक कार्यालयात आला होता. त्यानंतर त्याने हा प्रताप केला.
नोकरीसाठी टॉवरवर चढून इटकरेतील तरुणाची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:31 PM