विटा : टोप-तासगाव-भिवघाट ते दिघंची या राज्य महामार्गाचे काम ठेकेदारांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सुरू केले आहे. याबाबत जाब विचारणाऱ्यांना अर्वाच्च शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याने शेतकऱ्याने संबंधित ठेकेदारांविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल केला.
दरम्यान, महामार्गासाठी भूसंपादन न करता जमीन धमकावून घेतल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय किसान सभेने बुधवारी दिला. गेल्या दोन वर्षांपासून विजापूर ते गुहागर या महामार्गाच्या भूसंपादनप्रश्नी लढा सुरू आहे. सध्या टोप-तासगाव-भिवघाट ते दिघंची या राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. या रस्त्यासाठी शासनाची जेवढी जागा आहे, तेवढीच संपादन करण्यात येणार असल्याचे यापूर्वी संबंधित विभागाने सांगितले होते. सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराने आता शेतकऱ्यांच्या जमिनी कायदेशीर संपादित न करता परस्पर घेऊन त्याठिकाणी काम सुरू केले आहे.
त्यामुळे करंजे येथील बाधित शेतकरी राजेंद्र माने यांनी संबंधित ठेकेदाराला जमीन घेण्यास विरोध केला. त्यावेळी या कामाच्या सुपरवायझरने माने यांना अर्वाच्च शिवीगाळ करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे माने यांनी मंगळवारी सायंकाळी विटा पोलिसांत गुन्हा दाखल केला.
दरम्यान, या प्रकाराचा अखिल भारतीय किसान सभेने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. धमकावून जमिनी बेकायदेशीर संपादित केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. उमेश देशमुख, सरचिटणीस दिगंबर कांबळे, जिल्हा संघटक कॉ. गोपीनाथ सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष सुनील हसबे उपस्थित होते.