सांगली ,दि. ३० : गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्र आणि कर्नाटकात गुन्हेगारांनी कारवायांनी दहशत निर्माण केलेल्या विजापूर जिल्ह्यातील चडचण टोळी व पोलिस यांच्यात जोरदार गोळीबाराची चकमक झाली. कोकणगाव (ता. चडचण) येथे सोमवारी सकाळी ही थरारक घटना घडली. चकमकीवेळी झालेल्या गोळीबारात टोळीतील धर्मराज चडचण हा गंभीर जखमी झाला आहे.
कोकणगाव येथे घरात चडचळ टोळीचे सदस्य लपून बसले असल्याची माहिती विजापूर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी टोळीतील सर्व सदस्यांना पकडण्यासाठी मोहिम हाती घेतली. दहा ते पंधरा पोलिसांचा फौजफाटा कोकणगावमध्ये गेला. पोलिसांनी घराला वेढा दिला. चडचण टोळीतील सदस्यांना शरण येण्याचे आवाहन केले. पण टोळीने गोळीबार सुरु केला. त्यामुळे पोलिसांनाही स्वसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागला.
यामध्ये धर्मराज चडचण याच्या छातीत गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. एक पोलिसही पायाला गोळी लागून जखमी आहे. या दोघांना उपचारार्थ कर्नाटकमधील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. धर्मराजची प्रकृती चिंताजनक आहे. या दरम्यान टोळीतील सदस्य पळून गेले आहेत. त्यांच्या शोधासाठी कोकणगाव परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. या घटनेबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देण्यास पोलिस टाळाटाळ करीत आहेत.
चडचण टोळीविरुद्ध गंभीर गुन्हेचडचण टोळी गेल्या अनेक वर्षापासून गुन्हेगारीत सक्रिय आहे. या टोळीविरुद्ध महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, खंडणीसह गंभीर गुन्हे नोंद आहेत. टोळीचा म्होरक्या श्रीशैल चडचण याचाही काही वर्षापूर्वी चडचणमध्ये पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला होता.