विटा/पारे : बामणी (ता. खानापूर) येथे वादळी वाऱ्याने तीन एकर द्राक्षबाग भुईसपाट झाल्याची घटना आज (सोमवारी) पहाटे घडली. यात द्राक्षबागायतदार राजाराम बाळू लेंगरे (रा. बामणी) यांचे सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाले. अचानक आलेल्या वाऱ्याने अवघ्या वीस मिनिटात लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी फिरल्याने लेंगरे व त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. बामणी येथील राजाराम लेंगरे यांची बामणी व हातनोलीच्या मध्यभागी तीन एकर सोनाक्का जातीची द्राक्षबाग आहे. बागेत सुमारे ६० ते ७० टन द्राक्ष माल काढणीच्या स्थितीत होता. आज द्राक्षपीक काढण्याचा प्रारंभ सकाळी अकरा वाजता होणार होता. त्याची तयारीही पूर्ण करण्यात आली होती. परंतु, पहाटे अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने संपूर्ण तीन एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली. दुष्काळात टॅँकरने पाणी घालून जगविलेली तीन एकर द्राक्षबाग वादळी वाऱ्याने कोसळल्याने सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे लेंगरे यांच्यासह त्यांची मुले शहाजी, शशिकांत यांच्या कुटुंबावर मोठे नैसर्गिक संकट कोसळले.आ. अनिल बाबर यांनी बामणी येथे जाऊन द्राक्षबागेची पाहणी केली. शासन स्तरावर नुकसानभरपाईसाठी प्रयत्न केले जातील. पीक विमा योजनेचे निकष बदलण्याबाबत पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी संजय विभुते, भरत लेंगरे, सुखदेव माने, बबन शेळके, महावीर शिंदे, श्रीकांत सपकाळ, आनंदराव शेळके, कुमार शिंदे उपस्थित होते.दरम्यान, कृषी विभागाचे डी. एल. मसुगडे, पी. एन. पवार, तलाठी एफ. ए. मुल्ला यांनी द्राक्षबागेच्या नुकसानीचा पंचनामा करून तहसीलदार सौ. अंजली मरोड यांना अहवाल सादर केला. (वार्ताहर)ढगाळ हवामानसांगली जिल्ह्यात अद्यापही ढगाळ वातावरण आहे. पावसाची शक्यता असल्याने द्राक्ष, डाळिंब उत्पादकांसोबत रब्बी शेतकऱ्यांचेही धाबे दणाणले आहे. हजारो रूपयांची औषधे फवारूनही हवामानाच्या धास्तीमुळे उत्पादनाची खात्री नसल्याने शेतकरी हवालदिल आहे.
तीन एकर द्राक्षबाग भुईसपाट
By admin | Published: January 05, 2015 11:52 PM