तासगाव : तासगाव तालुक्यात शनिवारी सायंकाळी वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे अनेकांच्या घरांचे पत्रे उडाल्याने, प्रापंचिक साहित्य विस्कटून अनेकांचे संसार मोडून पडले. त्यामुळे तालुक्याला सुमारे ५० लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. स्टेजिंगची तार तुटून अंजनी येथील तीन एकर द्राक्षबाग कोसळून जमीनदोस्त झाली. चिंचणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळाखोलीचे पत्रे उडून गेले. आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले. अनेक गावांमध्ये वादळी वाºयामुळे घरांची पडझड झाली आहे.
अंजनी-गव्हाण रस्त्यालगत असलेल्या दत्तात्रय पांडुरंग पाटील यांच्या अनुष्का जातीच्या एक एकर द्राक्षबागेच्या स्टेजिंगचा तोल बिघडला व द्राक्षांचे वजन न पेलल्याने द्राक्षबाग कोसळली. यात ९ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अंजनी येथील विठोबा पाटील वस्तीवरील बापू मारुती माने आणि संजय रामचंद्र पाटील या दोघांची माणिक चमण जातीची प्रत्येकी एक एकर द्राक्षबाग कोसळली. माने यांना १६ ते १८ टन, तर पाटील यांना २० ते २२ टन द्राक्षांचे उत्पन्न अपेक्षित होते. बापू माने यांचे अंदाजे ९ लाख २० हजार रुपयांचे, तर संजय पाटील यांचे अंदाजे ११ लाख ५० हजार रुपये आर्थिक नुकसान झाले आहे.
सावळजच्या शिवाजीनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळाखोलीचे पत्रे उडून गेले. वायफळे, आरवडे, सावर्डे, लोढे, चिंचणी, अंजनीसह अनेक गावांतील काही घरांचे आणि जनावरांच्या गोठ्यांचे पत्रे उडून गेले. यामध्ये घरगुती साहित्यासह शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.