मिरज : मिरजेतील अॅपेक्स रुग्णालयचालक डाॅ. महेश जाधव याचा भाऊ डाॅ. मदन जाधव याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
अॅपेक्समध्ये कमिशनवर रुग्ण नेणाऱ्या तिघा चालकांच्या रुग्णवाहिका गांधी चौक पोलिसांनी पुरावा म्हणून जप्त केल्या.
मिरजेतील अॅपेक्स रुग्णालयात ८७ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालय चालक डाॅ. जाधव याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी डाॅ. जाधव बंधूंसह १३ जणांना अटक केली आहे.
पोलीस कोठडीत असलेल्या या डॉ. मदन जाधव याची पोलीस कोठडी संपल्याने गुरुवारी त्यास मिरज न्यायालयात हजर करण्यात आले. अॅपेक्समध्ये कमिशनवर रुग्ण आणून गैरप्रकारात सहभागी झाल्याबद्दल अटक केलेल्या सचिन अरुण चांदणे (रा. सांगोला), इनुस इलाही मुजावर (रा. सांगली) आणि वीरेंन उल्हास आवळे (रा. मिरज) हे तीन रुग्णवाहिका चालक पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तीन रुग्णवाहिका पोलिसांनी पुरावा म्हणून जप्त केल्या आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनाचा काळाबाजारप्रकरणी काहीजणांची चाैकशी सुरू असून याबाबत पोलिसांनी अद्याप माहिती दिलेली नाही.