मिरज : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची ३ कोटी ३७ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या मिरजेतील समीर अख्तर हुसेन (वय ३७, रा. तासगाव फाटा, मिरज) याच्याविराेधात मिरज ग्रामीण पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीर हुसेन याने ड्रीम मल्टिट्रेड सर्व्हिसेस या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपनीद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून सांगली जिल्ह्यासह कर्नाटकातील ४६ जणांची फसवणूक केली असल्याची तक्रार आहे. याबाबत योगेश शांताराम घस्ते (रा. पंढरपूर रोड, मिरज) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फसवणुकीची फिर्याद दिली आहे. समीर हुसेन याने संबंधित ४७ जणांना महिन्याला गुंतवणुकीवर १२ ते २५ टक्के नफ्याचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच ते सात लाख, असे तब्बल ३ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपये घेतले.
नंतर ठरल्याप्रमाणे परतावा व पैसे परत देण्यास टाळाटाळ सुरू केली. यामुळे घस्ते हे अन्य गुंतवणूकदारांसह समीरच्या घरी गेले असता, तो घरी नसल्याचे निदर्शनास आले. ताे फोनही उचलत नसल्याने गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यामुळे योगेश घस्ते यांच्यासह सुहास धुमाळ, नामदेव धुमाळ, फारूक शेख, नागार्जुन तलारी, संदीप पाटील, वसंत साले, प्रकाश म्हेत्रे, महेश जोशी, संतोषी सरवदे, धनपाल मानकापुरे, सुरेश पाटील, अंकुश सावंत, राजेंद्र जत्ती, अजित शिंदे, संजय पोळ, राहुल वायदंडे, अनिकेत काशीद (सर्व रा. मिरज),
रितेश भिसे, रेणुका भिसे, शंकर भिसे, सतीश शिंदे, दीपक जवलकर, युवराज कांबळे, नजीर कोपल, मुजम्मील इनामदार, संदीप भिसे, अशोक काळे, कल्याणी काळे, मीरा गोत्राळे, अश्विनी कुचनेवार, आनंद जाडर, श्रुती सावंत (सर्व रा. विजापूर), अनिल माळी, संतोष माळी, श्रीकांत चौगुले, प्रशांत हावरी (सर्व रा. कागवाड), संजय जोशी, संग्राम लिंगराम (दाेघेही रा. कोल्हापूर), बाळासाहेब चिक्कोडीकर (रा. शिरोली), रत्नाकर जोशी (रा. उचगाव), ऋतुराज साळुंखे (रा. सांगली), अभिजीत इंगवले, उमेश पाटील (रा. बिसूर), प्रशांत न्यामगोदार (रा. म्हैसूर), महेश चौगुले (रा. चिक्कोडी), रवींद्र माळी (रा. इंगळी) या ४७ लोकांनी समीर हुसेन याच्याविरोधात ग्रामीण पोलिसात धाव घेतली आहे. ग्रामीण पोलिसांनी समीर हुसेन याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू केला आहे.