आटपाडी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आजपासून (बुधवार) आटपाडीत नव्याने सुरू केलेल्या आठवडा बाजाराला तालुकावासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिल्याच बाजारात सुमारे साडेतीन कोटींची उलाढाल झाली.या बाजारात प्रथमच शेळ््या-मेंढ्यांसह २०० हून अधिक माणदेशी खिलार गाई, बैल, संकरित गाई आणि म्हैशी दाखल झाल्या. खिलार बैल बाजारात ५५ ते ६० हजार रुपये किमतीने, तर संकरित गाई ८० हजार रुपयांपर्यंत विकल्या गेल्या. शेळ््या-मेंढ्यांचीही चांगली उलाढाल झाली. जनावरे खरेदी करण्यासाठी कर्नाटकातून आणि पंढरपूर, अकलूज, सांगोला, भाळवणी या परिसरातून व्यापारी आले होते. भाजीपाल्याचे सौदेही झाले. भाजीपाला विक्रीसाठी तालुक्यातून शेतकरी आणि व्यापारी आले होते. सकाळी बाजार समितीच्या प्रशासक सौ. विजया बाबर, सरपंच सौ. स्वाती सागर, युवा नेते हर्षवर्धन देशमुख, एस. यू. जाधव यांच्यासह शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत बाजाराचा प्रारंभ करण्यात आला. आटपाडीत जनावरांचा बाजार भरविणे शेतकऱ्यांसाठी आवश्यक बाब होती. याशिवाय भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि आटपाडीकरांसाठीही हा दुसरा बाजार फायदेशीर ठरणार आहे. बाजार समितीच्यावतीने सुविधा पुरविणार आहोत.- सौ. विजया बाबरप्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती
आटपाडीच्या नवीन बाजारात साडेतीन कोटींची उलाढाल!
By admin | Published: January 21, 2015 10:53 PM