भिलवडी : पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार रजनीश ऊर्फ चन्या हणमंत मुळीक (वय २५, रा. वाळवा) याच्या खून प्रकरणाचा छडा भिलवडी पोलिसांनी अवघ्या दहा तासात लावला असून, याप्रकरणी सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून तीन संशयित आरोपींना अटक केली, तर एक फरार आहे. आकाश सुरेश अहिर (वय २५), संदेश ऊर्फ साहिल अशोक कदम (२४), इम्रान ऊर्फ मोहसीन ईलाई चौस (२७, सर्व रा. वाळवा) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, सोमवार दि. ३ रोजी दुपारी २ च्या सुमारास औदुंबर येथील दत्तमंदिराच्या दक्षिणेस कृष्णा नदीपात्रात धान्याच्या पोत्यामध्ये दगडासोबत बांधलेला तरुणाचा मृतदेह औदुंबर येथील नावाडी नितीन गुरव यांनी पाहिला व भिलवडी पोलिसांत माहिती दिली. या तरुणाचा गळा आवळून खून करून, पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह पोत्यामध्ये भरून सोबत दगड बांधून नदीत फेकला असल्याबाबत भिलवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे, पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप, पोलीस सचिन खाडे, नंदकुमार कदम, पंकज मंडले, सुप्रिल मोकाशी, धनंजय गायकवाड, अजित सूर्यवंशी, मारुती मस्के आदींच्या पथकाने रात्रभर ठिकठिकाणी छापे टाकून आकाश अहिर, संदेश कदम, इम्रान चौस या तीन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. या आरोपींचा आणखी एक साथीदार परागंदा असून त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.पूर्ववैमनस्यातून खून...मृत रजनीश मुळीक हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. मुळीक व चार संशयित आरोपी यांच्यामध्ये पूर्ववैमनस्य होते. यापूर्वी त्यांनी एकमेकांना जिवे मारण्याचा प्रयत्न करून मारहाण केली होती. हा राग मनात ठेवून संशयित चार आरोपींनी संगनमताने रजनीश मुळीक याला तो एकटा असल्याचे पाहून त्याचा गळा आवळून त्याचा खून केला, असे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती तपास अधिकारी सुनील हारुगडे यांनी दिली.
रजनीश मुळीकच्या खूनप्रकरणी तिघांना अटक;संशयित वाळव्यातील : एक फरार, भिलवडी पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 6:57 PM