सांगली : सांगली जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची साडेचार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके, वय ७१), त्यांची पत्नी हेमंती (६१) व मुलगा शिशिर (३४) या तिघांना आर्थिक गुन्हे शाखेने कारागृहातून अटक केली. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. डीएसके ग्रुपमध्ये गुंतवणूक केलेल्यांची फसवणूक केल्याप्रकरणी दीपक कुलकर्णी यांना २०१८मध्ये अटक करण्यात आली होती. सध्या दीपक कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिशिर हे तिघेही येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. सांगली जिल्ह्यातील अनेकांनीही त्यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती. त्यापैकी साठहून अधिक गुंतवणूकदारांनी, आपली फसवणूक झाल्याची तक्रार सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे केली आहे. फसवणुकीची रक्कम जवळपास साडेचार कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेने येरवडा कारागृहातून डीएसके त्यांची पत्नी व मुलाला अटक केली. रात्री उशिरा त्यांना सांगलीत आणण्यात आले. मंगळवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी डीएसके यांच्यावतीने अॅड. धीरज घाडगे यांनी युक्तिवाद केला. डीएसके यांनी गुंतवणूकदारांचे पैसे परत करणार नाही, असे कधीही म्हटले नाही. त्यांनी पै न् पै परत करण्याची सातत्याने ग्वाही दिली आहे. ईडी, पुणे आर्थिक गुन्हे शाखांसह दिल्लीच्या तपास यंत्रणेनेही या प्रकरणाची चौकशी करून चार्जशीट दाखल केल्याचे सांगत, कोठडी न देण्याची विनंती केली, तर पोलिसांनी पाच दिवस कोठडीची मागणी न्यायालयात केली. एकोणीस मुद्द्यांवर तपास करण्याची गरज असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाने डीएसके यांना १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
‘डीएसके’सह तिघांना अटक; दोन दिवस पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 6:42 PM