सांगली : आंध्र प्रदेशातील गलाई व्यवसायिकाच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकून लुटणाऱ्या तिघांना पोलिसांनी जेरबंद केले. सुरज बळवंत कुंभार (वय ३३, रा. कुर्ली ता. खानापूर), कैलास लालासाहेब शेळके (३०, रा. बामणी ता. खानापूर) आणि सादीक ताजुद्दीन शेख (३५, रा. इचलकरंजी) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून तब्बल एक कोटी ७७ लाख रुपये किंमतीचे तीन किलो सोने जप्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि आंध्र प्रदेश पोलिसांच्या संयुक्त पथकाने बुधगाव (ता. मिरज)जवळ ही कारवाई केली.नामदेव गुरूनाथ देवकर (रा. टनुकू जि. पश्चिम गोदावरी, आंध्र प्रदेश) याचा गलाई व्यवसाय आहे. संशयित सुरज कुंभार हा त्यांच्याकडे कामगार म्हणून काम करत होता. १२ सप्टेंबर रोजी कुंभार आणि त्याचे साथीदार देवकर यांच्या घरात घुसून हत्याराचा धाक दाखवून, देवकर कुटूंबियांचे पाय बांधून व तोंडावर पट्टी बांधून घरातील सोन्याची दागिने, बिस्कीटे आणि एक लाख रुपयांची रोकड, कार घेऊन पसार झाले होते.आंध्र प्रदेश पोलिसांचे पथक या प्रकरणाचा तपास करत होते. गुन्ह्यात सांगली जिल्ह्यातील दोघांचा सहभाग असल्याने पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनीही गंभीर दखल घेत तपासाच्या सूचना दिल्या होत्या. गुरूवारी आंध्र प्रदेश पोलिस आणि एलसीबीचे पथक गस्तीवर होते. यावेळी पथकाला माहिती मिळाली की, बुधगाव जवळ असलेल्या एका ढाब्यासमोर तिघे संशयित थांबले आहेत. त्यानुसार पथकाने तिथे जात सर्वांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याजवळील पिशवीत सोने मिळाले. याबाबत अधिक चौकशीत त्यांनी टनुकू येथील दरोड्याची कबुली दिली.एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, आंध्र प्रदेश पोलिसांचे उपअधीक्षक सी. सरथ राजकुमार, सी.एच. अंजनेवेलू, सी. एच. व्यंकटेशराव, डी. आदीनारायण, एलसीबीचे सहायक निरीक्षक पंकज पवार, सिकंदर वर्धन, अमर नरळे, अमोल लोहार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
Sangli: आंध्रातील दरोड्याचा छडा; पावणे दोन कोटींचे सोने जप्त, तिघे जेरबंद
By शरद जाधव | Published: October 13, 2023 5:58 PM