घनशाम नवाथेसांगली : हरिपूर (ता. मिरज) येथील बंद बंगला फोडून पुरावा न सोडता पसार झालेल्या तौफिक सिकंदर जमादार (वय ३१) , दिपक पितांबर कांबळे (वय २७, दोघेही रा. उमळवाड, ता. शिरोळ) आणि समीर धोंडिबा मुलाणी (वय ३१, रा. कुंभोज, ता. हातकणंगले) या तिघांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मुसक्या आवळल्या. तिघांकडून ३८ लाख ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडून सांगली ग्रामीणचे पाच गुन्हे, संजयनगर व शिरोळचा एक गुन्हा असे सात गुन्हे उघडकीस आणले.
अधिक माहिती अशी, सांगली शहर आणि परिसरात काही महिन्यांपासून घरफोड्यांचे गुन्हे घडत आहेत. हरिपूर येथेही दोन आठवड्यापूर्वी दोन बंगले फोडण्याची घटना घडली होती. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हे अन्वेषणच्या शाखेला गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. हरिपुरातील घरफोड्यांचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी उपनिरिक्षक कुमार पाटील यांचे पथक नियुक्त केले होते.
गेल्या दहा-बारा दिवसापासून पथक वेगवेगळ्या मार्गाने तपास करत होते. पथकातील संदिप नलावडे आणि अरुण पाटील यांना सोमवारी सकाळी तिघे संशयित जुना हरिपूर रस्ता परिसरात दुचाकी (एमएच ०९ ईएच ७११०) वरून चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. परिसरात सापळा रचल्यानंतर काही वेळाने तिघेजण दुचाकीवरुन घटनास्थळी आले. त्यांना पलायन करण्याची संधी न देता ताब्यात घेतले. दुचाकीस अडकवलेल्या पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये सोने - चांदीचे दागिने असल्याचे निदर्शनास आले.संशयितांकडे दागिन्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. चौकशीत संशयित तौफिक जमादार, दिपक कांबळे आणि समीर मुलाणी यांनी हरिपूर गावात मागील सहा महिन्यांपासून बंद घरे फोडली असल्याची कबुली दिली. तसेच वारणाली परिसरातून एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी हस्तगत केलेला ऐवज चोरीतील असल्याचे त्यांनी सांगितले. तिघांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत पाच, संजयनगर आणि शिरोळ ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक गुन्हा केल्याचे सांगितले.
निरीक्षक सतीश शिंदे, उपनिरीक्षक कुमार पाटील, कर्मचारी दरीबा बंडगर, सागर लवटे, अमर नरळे, प्रकाश पाटील, सुशिल मस्के, सूरज थोरात, योगेश पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
नवीन पुलाचा असाही फायदा
हरिपूर-कोथळी हा सांगली-कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा पूल काही महिन्यांपूर्वीच खुला झाला आहे. या पुलामुळे चोरटे सहजपणे कोथळीहून हरिपुरात येत होते. बंद बंगले, घरे हेरून चोरी करत होते असे तपासात स्पष्ट झाले. दोन्हीकडच्या नागरिकांबरोबर चोरट्यांनीही नवीन पुलाचा फायदा घेतला होता. या पुलावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज भासू लागली आहे.
दोघे सराईत गुन्हेगार
तौफिक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली जिल्ह्यात घरफोडी, दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर मुलाणी याच्यावर सातारा जिल्ह्यात दरोड्याचा गुन्हा नोंद आहे. दीपक हा मजुरी करतो. तो त्यांच्या टोळीत सहभागी झाला होता.