सांगली : कोंगनोळी ते अग्रणी धुळगाव रस्त्यावर महिलेस चाकूचा धाक दाखवून १ लाख १५ हजारांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या अक्षय श्रीकांत पाटोळे (वय २४, रा. गुरलेश्वरआप्पा मंदिराजवळ, डफळापूर, ता. जत), अमोल बाबासाहेब रुपनर (वय २२, रा. रुपनरवाडी, नागज, ता. कवठेमहांकाळ) आणि किसन लक्ष्मण नरळे (वय २२, रा. नरळे वस्ती, घोरपडी, ता. कवठेमहांकाळ) या तिघांना अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषणने मिरज बसस्थानकावर ही कारवाई केली.
अधिक माहिती अशी, दीपाली अरुण मगर (रा. कोंगनोळी, ता. कवठेमहांकाळ) या दि. १० ऑक्टोबरला त्यांच्या दुचाकीवरून सकाळी १०:५० च्या सुमारास कोंगनोळी ते अग्रणी धुळगाव रस्त्यावरून जात होत्या. तेव्हा दुचाकीवरून आलेल्या तिघांनी दीपाली यांची दुचाकी अडविली. त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेले २३ ग्रॅम वजनाचे १ लाख १५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने काढून घेऊन पलायन केले होते. याप्रकरणी मगर यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास सोमवारी तिघेजण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी मिरज बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा लावला होता. तेथे पाळत ठेवून फिरत असताना बसस्थानकाच्या पाठीमागे तिघेजण संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आले. तिघांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता दागिने आढळले. चौकशीत सुरुवातीला तिघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केल्यानंतर तिघांनी मित्र तुषार गायकवाड (रा. नागज) याच्यासह महिलेस चाकू दाखवून दागिने लुटल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरलेले दागिने हस्तगत केले. तिघांना कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार, कर्मचारी दीपक गायकवाड, अमोल ऐदाळे, आमसिद्ध खोत, अरुण पाटील, अमर नरळे, प्रकाश पाटील, विनायक सुतार, अभिजित ठाणेकर, सूरज थोरात, सुनील जाधव, सुशांत चिले, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने कारवाई केली.