मिरज : मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष व भाजप स्टार्ट अप इंडियाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांचा शेतजमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने वार करून खून केल्याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने तिघांनाही चार दिवस पोलिस कोठडी दिली आहे. खुनानंतर शेतात लपवून ठेवलेली कुऱ्हाड पोलिसांनी हस्तगत केली.सुधाकर खाडे यांनी मिरजेत चंदनवाले मळा येथील पावणेचार एकर जमीन विकसनासाठी घेतली होती. मात्र जमिनीच्या कब्जेदारांनी यास हरकत घेतल्याने वाद सुरू होता. शनिवारी सकाळी सुधाकर खाडे आठ ते दहा साथीदारांसोबत या वादग्रस्त जागेवर कुंपण घालण्यासाठी गेल्यानंतर जमिनीचे कब्जेधारक लक्ष्मण चंदनवाले यांचा मुलगा युवराज उर्फ कार्तिक चंदनवाले याने सुधाकर खाडे यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून त्यांचा खून केला. खाडे यांच्यासोबत आलेल्या प्रशांत जैनावत याच्यावर लक्ष्मण चंदनवाले याने कुदळीने वार केला. खून करण्यासाठी वापरलेली कुऱ्हाड कार्तिक याचा चुलतभाऊ गणेश चंदनवाले याने शेतात लपवून ठेवली. खूनप्रकरणी पोलिसांनी युवराज चंदनवाले, लक्ष्मण चंदनवाले, गणेश चंदनवाले यांना पोलिसांनी अटक करून शेतात लपवलेली कुऱ्हाड ताब्यात घेतली. तिघांना रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर दि. १३ पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.
Sangli: भाजप नेते सुधाकर खाडे खूनप्रकरणी तिघांना अटक, चार दिवस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 12:18 PM