सांगली, 9 : येथील त्रिमूर्ती कॉलनी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने तीन लहान मुलांवर हल्ला करुन त्यांच्या शरीराचे लचके तोडले. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. या कुत्र्याने प्रचंड धुमाकूळ घातल्याने शेवटी नागरिकांनी त्याला मारहाण करुन ठार मारले.
शुभम सिध्दाराम बिराजदार (वय ४), आरोही बाबासाहेब संगोलकर (३) व विराज सुनील रेड्डी (६, तिघेही रा. त्रिमूर्ती कॉलनी, सांगली) अशी जखमी मुलांची नावे आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. ही तीनही मुले त्रिमूर्ती कॉलनीतील स्वामी समर्थ मंदिरजवळ खेळत होती. त्यावेळी एक मोकाट पिसाळलेले कुत्रे आले व त्याने या मुलांवर हल्ला करुनत्यांच्या शरीराचे लचके तोडले.
मुलांच्या रडण्याच्या आवाजाने परिसरातील लोक आले व त्यांनी कुत्र्यावर दगडाने व काठीने हल्ला केला. यामध्ये कुत्रे अर्धमेले होऊन पडले. ते ठार झाले असावे, असा अंदाज करुन नागरिकांनी त्याला तिथेच सोडले. पण रात्री पाऊस झाल्यानंतर हे कुत्रे पुन्हा उठले. त्याने रविवारी सकाळी तीन कुत्र्यांवर हल्ला करुन त्यांनाही चावा घेतला. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा या कुत्र्याचा शोध घेऊन त्यास ठार मारले.
याची माहिती मिळताच महापालिकेची डॉग व्हॅन दाखल झाली. त्यांनी या कुत्र्याचा मृतदेह उचलून नेला, तसेच ज्या कुत्र्यांना त्याने चावा घेतला होता, त्या कुत्र्यांनाही पकडले. जखमी मुलांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मुलांच्या चेहरा, गळा व पोटावर कुत्र्याने लचके तोडले आहेत.नगरसेवक गायबत्रिमूर्ती कॉलनी परिसरात मोकाट कुत्र्यांचे प्रमाण वाढलेले आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोस्त करावा, म्हणून परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा महापालिका व नगरसेवकांकडे तक्रार केली आहे. रात्रीच्या वेळी कुत्र्यांचे टोळके वाहनधारकांच्या अंगावर धावून येते. अनेकदा छोटे-मोठे अपघातही घडले आहेत. वारंवार तक्रारी करूनही याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रविवारी सकाळपासून डॉग व्हॅन कुत्र्यांचा शोध घेत होती. दिवसभरात त्यांनी चार कुत्री पकडली. तीन मुलांवर कुत्र्याचा हल्ला होऊनही याभागाचे नगरसेवक या भागात फिरकलेही नाहीत, असे नागरिकांनी सांगितले.
तातडीने परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे. महापालिकेतर्फे मोकाट कुत्री पकडण्याचे काम सुरु आहे. त्यांची नसबंदी केली जात आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरच करण्यात येणार आहे. पकडलेली कुत्री एकत्रित ठेवता येतील का, याचे नियोजन सुरु आहे.- डॉ. सुनील आंबोळी,महापालिका आरोग्य अधिकारी, सांगली.