सांगली : मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये भाडेकरूच्या घरात सापडलेली तीन कोटीची रोकड आयकर विभागाच्या वरिष्ठ पथकाने सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतली. ही रक्कम आली कोठून, याचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला अजूनही यश आलेले नाही. त्यामुळे याचे गूढ वाढले आहे. चिक्कोडी येथील मिळालेली माहिती चुकीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पण ही रोकड चोरीतील असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पथकाने अटकेत असलेल्या मुल्लाच्या जाखले (ता. पन्हाळा) येथील घरावर छापा टाकून झडती घेतली. पण तेथे हाती काहीच लागले नाही.मैनुद्दीन ऊर्फ मोहिद्दीन मुल्ला याने प्रेमविवाह केल्यानंतर तो, मिरजेतील बेथेलहेमनगरमधील त्याची मेहुणी रेखा भोरे हिच्याकडे राहत होता. अचानक त्याच्या राहणीमानात बदल झाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने त्याच्यावर लक्ष केंद्रित केले होते. दोन दिवसांपूर्वी त्यास शहरात बुलेटवरुन फिरताना पकडले होते. त्याच्या झडतीत सव्वालाख रुपये सापडले. त्यामुळे बेथेलहेमनगरमध्ये त्याच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी घरात सुमारे तीन कोटी सात लाख ६५ हजार पाचशे रुपयांचे घबाड सापडले होते. मुल्लाने चौकशीत एका ‘टिपर’च्या मदतीने ही रक्कम कर्नाटकातील एका खासदाराच्या संस्थेची चोरल्याची कबुली दिली होती. ८ मार्चला चिक्कोडी येथून ही रक्कम चोरल्याचे त्याने सांगितले होते. पण त्याची ही माहिती तपासात दिशाभूल करणारी ठरली आहे. चिक्कोडीत ही घटना घडली आहे. पण ती फार दिवसांपूर्वी घडली आहे. त्यातील संशयितांना अटक झाली आहे. मुल्लाचा या घटनेशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारीही पथकाने चिक्कोडीत जाऊन चौकशी केली. आयकर विभागाचे वरिष्ठ निरीक्षक एस. व्ही. देसाई व शेखर कुमार यांचे पथक सोमवारी दुपारी सांगलीत दाखल झाले. त्यांनी पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांची भेट घेऊन या कारवाईची माहिती घेतली. त्यांनी रकमेची पाहणी करुन ती ताब्यात घेण्याची कार्यवाही पूर्ण केली. ही रक्कम भारतीय स्टेट बँकेत तातडीने जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण सायंकाळ झाल्याने हा निर्णय रद्द करण्यात आला. उद्या (मंगळवार) सकाळी ही रक्कम बँकेत जमा केली जाणार आहे. दरम्यान, पथकाने मुल्लाच्या जाखले येथील घरावर छापा टाकून झडती घेतली. मात्र हाती काहीच लागले नाही. त्याच्या घरच्यांची चौकशी करुन पथक रात्री उशिरा सांगलीत दाखल झाले. (प्रतिनिधी)बुलेट खरेदी : पोलिसांकडून चौकशी सुरूमुल्ला याने आठवड्यापूर्वी सांगलीतील अभय अॅटो शोरुममधून दोन बुलेट खरेदी केल्या आहेत. यातील एक बुलेट त्याने मिरजेतील गांधी चौक पोलीस ठाण्याच्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या नावावर खरेदी केली आहे. हा पोलीस कोण? याचे नाव रेकॉर्डवर आले आहे. पण आजही त्याचे नाव सांगण्यास पथकाने नकार दिला. बुलेट खरेदीसाठी तब्बल आठ-नऊ महिने ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागते. परंतु मुल्लाला पैसे भरल्यानंतर तातडीने दोन बुलेट देण्यात आल्या. यासाठी त्याने कागदपत्रे दिली होती का? दोन्ही बुलेट आरटीओ कार्यालयाकडून पासिंग करुन देण्यात आल्या होत्या का?, या सर्व बाबींची संबंधित अभय अॅटो शोरुमच्या मालकाकडे चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. रक्कम चोरीतील; पण कुणाची?मुल्लाकडून जप्त केलेली रक्कम चोरीतील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने चिक्कोडीच्या दिलेल्या माहितीचा ‘बार’ फुसका ठरला आहे. त्यामुळे याच्या मुळापर्यंत जाऊन याचा छडा लावणे आव्हान बनले आहे. रक्कम चोरली कोठून, त्याच्यासोबत आणखी कोणाचा सहभाग आहे, या रकमेचे ते काय करणार होते, पोलिसाच्या नावावर त्याने बुलेट का घेतली, त्याने स्वत:साठी बुलेट का घेतली, अलीकडच्या काळात ही रक्कम सांगली जिल्ह्यातून चोरीला गेलेली असेल, तर संबंधित व्यक्तीने पोलिसांत तक्रार का केली नाही, या सर्व बाबींचा पथकाला उलगडा करावा लागणार आहे.
तीन कोटी ‘आयकर’च्या ताब्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2016 10:55 PM