दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव तालुक्यात गेल्यावर्षी द्राक्ष निर्यातीच्या हंगामात तब्बल तीन कोटी रुपयांना दलालांनी चुना लावला आहे. ही आकडेवारी केवळ पोलीसदप्तरी नोंद झालेली आहे. प्रत्यक्षात याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात द्राक्षबागायतदारांची फसवणूक झालेली आहे.
द्राक्षबागायतदारांना निर्यातीची घाई, जादा दराचे आमिष यासह बाजार समितीच्या उदासीन कारभाराने प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपयांना गंडा बसतो. गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करूनही शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही. त्यामुळे पोलीस हतबल असून, द्राक्षबागायतदारांची जागरुकता व रोखीचा व्यवहारच फसवणुकीपासून त्यांना परावृत्त करू शकतो.
तासगाव तालुक्यात द्राक्षाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. चांगला दर्जा आणि चवदार द्राक्षांमुळे तालुक्यातील द्राक्षांना मागणीही मोठी असते. द्राक्ष निर्यातीला डिसेंबर महिन्यात सुरुवात होते. महाराष्टÑासह देशभरातील व्यापारी द्राक्ष खरेदीसाठी तासगावात तळ ठोकून राहतात. द्राक्ष निर्यातीच्या काळात अब्जावधी रुपयांची उलाढाल तालुक्यात होते.
परराज्यातून आलेले व्यापारी स्थानिक एजंटांच्या माध्यमातून गावा-गावातून द्राक्षे खरेदी करतात. सुरुवातीच्या टप्प्यात व्यापाºयांकडून द्राक्षबागायतदारांचा विश्वास संपादन केल्यानंतर, द्राक्षाचे लाखो रुपयांचे व्यवहार हे केवळ विश्वासावर होतात. अशातच नुकसानीमुळे किंवा फक्त फसवणुकीच्या उद्देशाने आलेले दलाल पसार होतात. या दलालांचा ठावठिकाणा लागत नाही. पत्ता लागला तरीदेखील शेतकºयांच्या पदरात काहीच पडत नाही.
मागीलवर्षी तासगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचे तेरा गुन्हे नोंद झाले आहेत. २ कोटी ७९ लाख २ हजार ६७२ रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात आहे. ही केवळ रेकॉर्डवरील आकडेवारी आहे. मात्र प्रत्यक्ष फसवणुकीचा आकडा याहीपेक्षा मोठा आहे. ही फसवणूक केवळ एकाचवर्षी झाली असेही नाही. प्रत्येकवर्षी द्राक्षबागायतदारांची फसवणूक करून चुना लावला जात आहे.
प्रत्येक दलालाने गंडा घातल्याचे गुन्हे पोलिसांत दाखल केले जातात. पोलिसांकडूनही त्याचा कसून तपास केला जातो. अगदी दिल्ली, कोलकाता, केरळ, तामिळनाडूपर्यंत पोहोचून व्यापाºयांचा शोध घेतला जातो. मात्र अशा प्रकारात व्यापाºयांची साखळी असल्याचे स्पष्ट होते. मात्र पुढील व्यापाºयांचा सुगावा लागत नाही. सुगावा लागलाच तरी, तो व्यापारी दिवाळखोर असल्याचे दिसून येते. त्यामुळे गुन्हे दाखल होऊनही अपवादानेच शेतकºयांना फसवणुकीची रक्कम परत मिळाली आहे.बाजार समितीही उदासीनद्राक्षबागायतदारांच्या फसवणुकीला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी नोंदी ठेवणे बंधनकारक केले आहे. मात्र तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची याबाबत उदासीन भूमिका आहे. बेदाण्यातून महसूल मिळत असल्याने बाजार समितीने केवळ बेदाण्यापुरतेच कार्यक्षेत्र मर्यादित ठेवले आहे. द्राक्षबागायतदारांसाठी बाजार समितीने परवाने बंधनकारक करून अंकुश ठेवल्यास फसवणुकीला काही प्रमाणात आळा बसू शकतो. त्यासाठी गेल्यावर्षी पोलिसांनी बाजार समितीला सूचना केल्या होत्या; मात्र बाजार समितीकडून शेतकरी हितासाठी कोणतेच पाऊल उचलले गेले नाही.
रोखीने व्यवहार कराद्राक्ष दलालांकडून फसवणूक टाळण्यासाठी रोखीने व्यवहार करणे, हा एकमेव उपाय आहे.द्राक्ष बागायतदारांची जागरुकता करणे, एकसंधपणे रोखीशिवाय विक्री करण्याचा निर्णय घेणे आवश्यक आहे. नाही तर नेहमीप्रमाणे याही हंगामात पुन्हा कोट्यवधी रुपयांची फसवणूक होऊन शेकडो द्राक्ष उत्पादक भिकेकंगाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शेतकºयांनी द्राक्ष विक्री करताना सतर्कता घेणे आवश्यक आहे. द्राक्ष व्यापाºयांची नोंदणी करण्याचे आदेश पोलीस पाटलांना दिले आहेत. अनेकदा जादा दराच्या आमिषाने स्थानिक एजंटांकडून कमिशनच्या भूलभुलैयातून शेतकºयांची फसवणूक केली जाते. मात्र यावेळी अशी फसवणूक झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही.- अशोक बनकर, पोलीस उपअधीक्षक, तासगाव