फोटो ओळी : आमदार अनिलभाऊ बाबर व तानाजीराव पाटील यांच्या माध्यमातून पुजारवाडीच्या ओढ्यावरील तीन बंधारे राजेवाडी कॅनॉलच्या पाण्याने पूर्ण क्षमतेने भरण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघंची : पुजारवाडी-दिघंची (ता. आटपाडी) येथील ओढ्यावरील तीन बंधारे गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या राजेवाडी कॅनॉलच्या पाण्याने पूर्ण क्षमतेने भरण्यात आले आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दिघंची-पुजारवाडीचा भाग म्हणजे ‘माणगंगा नदी उशाला, पण कोरड घशाला’ असाच होता. गेल्या दोन वर्षापूर्वी या भागाला टँकरने पाणी पुरवठा होत होता. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बागा टँकरने पाणी विकत घेऊन जोपासल्या. परंतु गेल्या दोन वर्षापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला असल्याने या भागातील शेतकरी समाधानी आहेत.
गत दोन वर्षापूर्वी ‘पानी फौंडेशन’ व जलयुक्त शिवार या योजनेतून पुजारवाडी ओढ्याचे खोली व रुंदीकरण करण्यात आले होते. या ओढ्यावर नवीन तीन बंधारे बांधण्यात आले आहेत. सध्या त्याला आमदार अनिल बाबर व तानाजीराव पाटील यांच्या माध्यमातून राजेवाडी कॅनॉलचे पाणी सोडून हे तीन बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात आले आहेत.
सध्या उन्हाळा सुरू असल्याने विहिरींनी तळ गाठला आहे, तर ओढ्याला पाणी सोडण्यात आल्याने विहिरी व कूपनलिका यांच्या पाणी पातळीत वाढ होणार असून या भागातील शेतकऱ्यांना पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. यासाठी पुजारवाडीच्या सरपंच अनिता होनमाने, उपसरपंच चैत्राली मिसाळ, युवा नेते ब्रम्हदेव होनमाने, किरण मिसाळ व ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी पाठपुरावा केला.