सांगली: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे येथील गाभा क्षेत्रात विनापरवाना शस्त्रास्त्रांसह घुसलेल्या तीन आरोपीना वन्यजीवच्या पथकाने पकडले असून तिघांनाही रत्नागिरीच्या न्यायदंडाधिका-यानी पाच दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. संदिप तुकाराम पवार, मंगेश जनार्दन कामतेकर, अक्षय सुनील कामतेकर अशी कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत. यासंदर्भात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कराड स्थित चांदोली राष्ट्रीय उद्यानचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यानी दिलेल्या माहितीनुसार व प्रसिद्धीस दिलेल्या प्रेस नोट नुसार अधिक माहिती अशी.अखिल भारतीय व्याघ्र गणनेसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमे-यात काही आरोपी ३१मार्चला कैद झाले होते त्याची पाहणी वन्यजीव चे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यानी केली व कराडच्या वन्यजीव कार्यालयास याची माहिती दिली.त्यानंतर विभागिय वनाधिकारी विशाल माळी,उपसंचालक उत्तम सावंत, यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक वनसंरक्षक गणेश पाटोळे ,फिरती पथकाचे शिशूपाल पवार याना पाचारण करून पथकामार्फत आंबा व आसपासच्या गावातील व डोंगरकपारीतील वाड्यावस्तीवर संशयीतांचा शोध घेण्याचे काम एक एप्रिल ला सुरू केले. खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हातिव(गोठणे पुनर्वसितगाव) येथे तपास पथक पोहचल्यावर गावात संशयास्पद हालचाली दिसून आल्या. कसून चौकशी केल्यावर एक संशयित आरोपी मिळून आला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर दुसरे दोन संशयीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दोन एप्रिल ला मारळ ता.संगमेश्वर येथील दोघा आरोपीना ताब्यात घेतले.त्यांच्यावर वन्यजीव कायदा १९७२ अंतर्गत अटक करून गुन्हा दाखल करून देवरुख येथे वैद्यकीय चाचणी करून त्याना रत्नागिरीतील न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले.त्यानी सदरच्या तीन आरोपीना ७ एप्रिल पर्यंत वनकोठडी (फाॅरेस्ट कस्टडी) सुनावली आहे.सदरच्या गुन्ह्य़ात वन्यप्राण्यांच्या शिकारीची शक्यता असून त्यांचे मोबाईल मध्ये अनेक संशयास्पद फोटो आढळून आले आहेत. त्यामुळे महत्वाचे धागेदोरे हाती येण्याची शक्यता आहे.या करवाईत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक नानासाहेब लडकत,उपसंचालक उत्तम सावंत, विभागीय वनाधिकारी विशाल माळी,सहाय्यक वनसंरक्षक गणेश पाटोळे,वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे,फिरती पथकाचे वनक्षेत्रपाल शिशूपाल पवार, निवळेचे वनपाल गारदी,वनरक्षक दणाणे,रत्नागिरी वनविभाग अधिकारी दिपक खाडे, वनक्षेत्रपाल प्रियांका लगड,देवरुख चे वनपाल मुल्ला ,वनरक्षक गावडे व स्थानिक पोलीस पाटील व सरपंच सहकार्य लाभले.दरम्यान सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कराड च्या कार्यालयाने जाहीर आवाहन केलंय की, वन्य पशू पक्षी पाळणे, हाताळणे, विक्री करणे व शिकार करणे वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार कायद्याने गुन्हा आहे .वन्य पशूपक्षी याना हानी पोहचवणा-याबद्दल माहिती मिळताच हॅलो फाॅरेस्ट च्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर व जवळच्या वनविबागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात शस्त्रास्त्रांसह विनापरवाना घुसलेल्या तिघांना पाच दिवसांची वनकोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2022 3:48 PM