मिरज : मिरजेत कृष्णाघाटावर सुभाषनगर येथील अंबिका नवरात्र मंडळाच्या दुर्गादेवीच्या मूर्तीचे नदीत विसर्जन करताना दोघा सख्ख्या भावांसह तिघे तरुण बुडाले. येथे शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली. बुडालेल्यापैकी दोघांना वाचविण्यात यश आले, तर एक जण बुडाला. घाटावर महापालिकेने मूर्ती विसर्जनासाठी व्यवस्था केली नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.अमित राजेंद्र गायकवाड (वय १९, रा. साई कॉलनी, सुभाषनगर, मिरज) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. लक्ष्मण मोरे (वय ४५) व अमोल गायकवाड (वय १५) यांना इतरांनी पाण्यातून बाहेर काढले. बुडालेल्या अमित याचा अमोल हा सख्खा भाऊ आहे. त्याच्यावर मिरोत शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आयुष हेल्पलाईन व महापालिका अग्निशमन दलाने यांत्रिक बोटीच्या साहाय्याने रविवारी सकाळपासून बुडालेल्या अमितच्या शोधासाठी मोहीम राबवली. सुभाषनगरमधील अंबिका मंडळाच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी शनिवारी रात्री आठ वाजता मंडळाचे कार्यकर्ते कृष्णाघाटावर गेले होते. नदीपात्रात विसर्जनासाठी महापालिकेने तराफा व अन्य कोणतीही सोय केली नव्हती, त्यामुळे कार्यकर्त्यांनी नदीत उतरून मूर्तीचे विसर्जन केले. सर्व जण काठावर आल्यावर मूर्ती पाण्यात तरंगत असल्याचे दिसले. त्यामुळे लक्ष्मण मोरे यांच्यासह अमोल व अमित गायकवाड हे तिघे पुन्हा पाण्यात गेले. मूर्ती पाण्यात ढकलताना त्यांचा तोल गेला. तिघेही बुडू लागले. पाण्याच्या वेगवान प्रवाहात गटांगळ्या खाऊ लागले. यावेळी अन्य तरुणांनी पाण्यात उड्या घेत दोघांना वाचविले. अमित मात्र बुडाल्याने सापडला नाही. रात्री बारा वाजेपर्यंत त्याचा शोध घेण्यात आला. त्यानंतर रविवारी सकाळी पुन्हा मोहीम राबविण्यात आली. दिवसभराच्या शोधानंतरही तो सापडला नाही. अमित याचे पालक, नातेवाईक व मंडळाचे कार्यकर्ते नदीकाठावर बसून होते. आयुष हेल्पलाइन पथकाचे अविनाश पवार, नरेश पाटील, निसार मर्चंट, दिलावर बोरगावे, चिंतामणी पवार, सूरज शेख, साहिल जमादार, प्रमोद जाधव, सिद्धार्थ रणखांबे व अग्निशामक दलाच्या जवानांकडून नदीपात्रात शोधकार्य सुरू होते.
कृष्णाघाटावर विसर्जनाची व्यवस्था करणारमिरजेतील सुमारे १०० सार्वजनिक मंडळांनी देवीची प्रतिष्ठापना केली होती. या मंडळाच्या मूर्तींचे विसर्जन गणेश तलावात होणार असल्याने नदीपात्रात विसर्जन व्यवस्था केली नव्हती. भविष्यात कृष्णाघाटावरही विसर्जनाची व्यवस्था करू, असे महापालिकेचे सहायक आयुक्त अनिस मुल्ला यांनी सांगितले. घाटावर बंदोबस्त ठेवला होता. मात्र, विसर्जन व्यवस्थेची जबाबदारी महापालिकेची असल्याचे पोलिसांनी सांगितले.