कडेगाव- ताकारी योजनेची वीजबिल थकबाकी भरण्यासाठी आमदार मोहनराव कदम दादा यांचा सोनहिरा, वांगी व उदगिरी, पारे बामणी तसेच माजी आमदार पृथ्वीराज देशमुख बाबा यांचा केन अॅग्रो, रायगाव व ग्रीन पॉवर, गोपूज तसेच अरुण लाड अण्णा यांचा क्रांती हे साखर कारखाने प्रत्येकी १ कोटी रुपये अॅडव्हान्स देणार आहेत.
ताकारी योजनेची १० कोटी ५० लाख इतकी वीजबिल थकबाकी आहे. यापैकी योजनेची ५ कोटी १८ लाख इतकी थकबाकी महावितरणकडे भरून योजना शुक्रवार, दि. २९ डिसेंबर रोजी सुरू केली जाणार आहे. तसेच टेंभू योजनेचीही वीजबिल थकबाकी भरून आवर्तन सुरू करण्याबाबत लवकरच मार्ग काढला जाईल, असा निर्णय झाला.
कडेगाव येथे पत्रकारांच्या पुढाकाराने सोनहिरा साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, केन अॅग्रो कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार अनिल बाबर तसेच ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी ताकारी आणि टेंभू योजनांच्या वीजबिल थकबाकीबाबत तसेच आवर्तन सुरू करण्याबाबत यशस्वी चर्चा झाली.
ताकारी योजनेचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. यापैकी ५ कोटी १८ लाख इतकी थकबाकी भरल्यास वीजपुरवठा पूर्ववत जोडला जाणार आहे. सध्या योजनेकडे पाणीपट्टीचे कारखान्यांकडून जमा झालेले जवळपास १ कोटी २३ लाख रुपये जमा आहेत. आता सोनहिरा, उदगिरी, क्रांती, केन अॅग्रो आणि गोपूज कारखान्यांकडून प्रत्येकी १ कोटीप्रमाणे एकंदरीत ५ कोटी रुपये जमा होतील. ही रक्कम मंगळवार व बुधवार या दोन दिवसात देणार आहे, असे आमदार मोहनराव कदम, अरुण लाड व पृथ्वीराज देशमुख यांनी सांगितले.
गुरुवारी ५ कोटी १८ लाख वीज बिल थकबाकी महावितरणकडे भरली जाणार आहे. थकबाकी भरल्यावर वीजपुरवठा पूर्ववत होईल व ताकारी योजना २९ डिसेंबर रोजी सुरू करण्याचा निर्णय झाला.यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते, श्रमिक मुक्ती दलाचे मोहनराव यादव, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सुभाष मोहिते आदींसह पत्रकार उपस्थित होते.
‘टेंभू’साठीही एकत्र येण्याची गरज : बाबरकडेगाव पलूस तालुक्यातील नेते आमदार मोहनराव कदम, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, अरुण लाड हे राजकारण बाजूला ठेवून एकत्र आले. या तिन्ही नेत्यांसह टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रातील अन्य नेते व कारखानदार सर्व एकत्र आल्यास आवर्तनाचा मार्ग मोकळा होईल. शासनाकडून येणारी टंचाई निधीची रक्कम आणि पाणीपट्टी वसुलीशिवाय गरज पडल्यास अॅडव्हान्स घेऊन टेंभू योजनेचे आवर्तनही तातडीने सुरू करता येईल, असे आमदार अनिल बाबर यांनी सांगितले.
बाहेरील कारखान्यांनी पाणीपट्टी वसूल करावीताकारी आणि टेंभू योजनांच्या लाभक्षेत्राबाहेरील काही कारखाने योजनांची पाणीपट्टी वसूल करून देत नाहीत. परंतु ऊस मात्र नेतात. अशा कारखान्यांना जिल्हाधिकारी यांनी नोटीस देऊन त्यांच्याकडून पाणीपट्टी वसूल करून घ्यावी. शेतकºयांनीही अशा कारखान्यांना ऊस देऊ नये. अशा कारखान्यांच्या ऊसतोडीस शेतकºयांनी एकसंधपणे विरोध केला पाहिजे, अशी या बैठकीत चर्चा झाली.