सांगली : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत पोलिसांनी केलेल्या कारवाईची चाहूल लागताच, फरार झालेल्या तीन गुंडांना आष्टा (ता. वाळवा) येथे त्यांच्या घरातून अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रविवारी सकाळी या तीनही गुंडांना घरावर छापे टाकून पकडले.अटक केलेल्यांमध्ये उदय रघुनाथ मोरे (वय २७, रा. तेली गल्ली, आष्टा), मिथुन बाळासाहेब भंडारे (२९) व अभिषेक ऊर्फ मन्या आनंद हाबळे (१९, डांगे कॉलेजशेजारी, आष्टा) यांचा समावेश आहे.सहा जणांच्या टोळीला दीड महिन्यापूर्वी मोक्का लावण्यात आला होता. त्यावेळी टोळीतील तालीब लियाकत मुजावर (२३, राम मंदिरजवळ, आष्टा), अजिंक्य अरुण सावळवाडे (२०, घोरपडे गल्ली, आष्टा) व सागर प्रकाश वाघमोडे (२०, सुतार गल्ली, आष्टा) यांना अटक करण्यात आली होती, तर या कारवाईची चाहूल लागताच उदय मोरे याच्यासह मिथुन भंडारे व अभिषेक हाबळे पसार झाले होते.जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी त्यांना पकडण्याचे आदेश दिले होते. हे हे तिघेही आष्टा येथील त्यांच्या घरी आल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना रविवारी सकाळी मिळाली होती.
त्यानंतर पिंगळे यांच्या पथकाने त्यांच्या घरावर छापे टाकले. छाप्याची चाहूल लागताच तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच त्यांना पकडण्यात आले. त्यांना पुढील तपासासाठी आष्टा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पोलीस उपनिरीक्षक अंतम खाडे, सहायक फौजदार विजय पुजारी, हवालदार अशोक डगळे, सुनील चौधरी, संदीप पाटील, सतीश आलदर, अनिल कोळेकर व सलमान मुलाणी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.टोळीविरुद्ध १२ गुन्हेआष्ट्यातील या टोळीविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, मारामारी, दुखापत करणे असे १२ अशा गुन्यांचा समावेश आहे. टोळीतील गुंडांना पोलिसांनी यापूर्वीही अनेकदा अटक केली होती.
पण जामिनावर बाहेर आल्यानंतर ते पुन्हा गुन्हे करीत होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता. तत्कालीन पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.