पुनवत : फुपेरे (ता. शिराळा) येथील राजेश शामराव शिवमारे यांच्या जनावरांच्या वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन शेळ्या व बोकड ठार केले. या घटनेत शिवमारे यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. सोमवारी पहाटे ही घटना घडली. फुपेरे, शिराळे खुर्द, पुनवत, कणदूर भागात बिबट्या ठाण मांडून असून, वनविभागाने त्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
फुपेरे येथे जोतिबा मंदिराच्या पाठीमागे राजेश शिवमारे यांची जनावरांची वस्ती आहे. या वस्तीवर राजेश यांच्या तीन शेळ्या व बोकड बांधला होता, तर बाजूला त्यांच्या भावाची दोन मोठी जनावरे होती. सोमवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने या वस्तीवर हल्ला करून तीन शेळ्या व बोकडाला ठार केले. विशेष म्हणजे, आठ दिवसांपूर्वी शिवमारे यांच्या कुत्र्यालाही बिबट्याने गायब केले होते. या घटनेत शिवमारे यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले असून, वनविभागाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, शिराळे खुर्द येथेही एक दोन ठिकाणी बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. या बिबट्याच्या त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
चौकट
गावात कोरोना; शिवारात बिबट्या
परिसरातील अनेक गावांत कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे लोक अगोदरच चिंतित आहेत. अशा अवस्थेत शेतात जावे, तर बिबट्याचे भय आहे. त्यामुळे जायचे कुठे, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. गेल्या आठ दिवसांत कोरोना, बिबट्या व पावसाने लोक हैराण झाले आहेत.