शिरढोण : गावठी कुत्र्यांपासून स्वत:ला वाचविण्यासाठी जिवाच्या आकांताने पळत सुटलेले वानर मळणगाव - जायगव्हाण रस्त्यावरील ९० फूट खोल विहिरीत पडले होते. विहिरीला पायऱ्या नसल्याने जखमी वानर वर येऊ शकले नाही; परंतु गुरुवारी दुपारी तीन तासांचे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ राबवून सर्पमित्र आणि वन विभागाने स्थानिकांच्या मदतीने या जखमी वानराची सुटका केली.
बुधवारी सायंकाळी मळणगाव येथील कुंभार मळ्यातील एका विहिरीत वानर पडले. त्याच्या पायाला जखम झाल्याने त्याला वर विहिरीतून येता आले नाही. गुरुवारी सकाळी ही बाब स्थानिकांच्या निदर्शनास आली. याची कल्पना वन विभागाला तसेच कुची येथील सर्पमित्र विजय पाटील यांना देण्यात आली.
गुरुवारी दुपारी सर्पमित्र विजय पाटील आणि अतुल पाटील, श्रद्धा पाटील, गणेश पवार हे त्यांचे सहकारी ‘रेस्क्यू ऑपरेशनसाठी’ वानर पडलेल्या विहिरीजवळ आले. पोलीस पाटील मनोज जाधव, अधिक खंदारे आणि मणेराजुरी येथील आलेले संदीप बेडगे, सुनील पवार यांच्या सहकार्याने एक वाजता ‘रेस्क्यू ऑपरेशन’ सुरू केले.
विहिरीत अंदाजे ६० फूट पाणी होते. जखमी वानर कोपऱ्यात येऊन बसले होते. ऑपरेशन सुरू झाले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पडत्या पावसातच सर्वांनी 'रेस्क्यू ऑपरेशन' सुरूच ठेवले होते. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वानराला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले.
दमछाक झालेल्या वानराला विहिरीतून बाहेर काढून वनपाल शशिकांत नागरगोजे, विठ्ठल पाटील, दादासाहेब खामकर हे पथक पुढील उपचारासाठी कवठे महांकाळला घेऊन गेले.
फोटोओळ : विहिरीत पडून गंभीर जखमी झालेल्या वानराची सुटका करून पुढील उपचारासाठी कवठे महांकाळला नेण्यात आले.