इस्लामपूर : कुंडलवाडी (ता. वाळवा) येथे विहिरीतील पाण्याच्या वादातून काठी आणि खुरप्याने हल्ला करून तिघांना जखमी केल्याच्या खटल्यात येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी के.के. कुरंदळे यांनी तिघांना प्रत्येकी तीन महिने सश्रम कारावास आणि प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
हारुण अकबर नायकवडी, दस्तगीर अबकर नायकवडी, मोहसीन दस्तगीर नायकवडी (तिघे रा. कुंडलवाडी) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. दंडाच्या सहा हजार रकमेपैकी पाच हजार रुपये तिघा जखमींना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
या हल्ल्यात फिर्यादी ताजुद्दीन सल्लाउद्दीन नायकवडी, नईम ताजुद्दीन नायकवडी आणि अस्लम सल्लाउद्दीन नायकवडी हे तिघे जखमी झाले होते. कुरळप पोलिसात या गुुन्ह्याची नोंद झाली होती. तपास अधिकारी ए.एस. पाटील यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. फिर्यादीतर्फे सरकारी वकील भैरवी मोरे यांनी काम पाहिले. पोलीस कर्मचारी संदीप शिद यांनी सरकार पक्षाला खटल्याच्या कामकाजात मदत केली.