मिरज : मिरज ते मालगाव रस्त्यावर लक्ष्मीनगर येथे पंढरपूरहून बेळगावकडे परतणाऱ्या वारकऱ्यांना किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली. जखमी झालेल्या तिघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेळगाव जिल्ह्यातील तुरमुरी या सीमाभागातील ३० वारकरी पंढरपूरमध्ये आषाढी वारी करून गुरुवारी ट्रकमधून (केए २२ डी ८५३५) गावी परत जात होते. यावेळी रत्नागिरी-नागपूर महामार्गावरून ट्रक मिरजेकडे जाण्याऐवजी मालगावच्या दिशेने गेला.
मालगाव रस्त्यावर लक्ष्मीनगर येथे एक चारचाकी वाहन रस्त्यात उभे केले होते, त्यामुळे ट्रक पुढे जाऊ शकत नव्हता. ट्रकचालक व वारकऱ्यांनी चारचाकी वाहन काढण्याची विनंती वाहनचालकाला केली. त्यातून ट्रकचालक श्रीकांत मनवाडकर (वय ५५, रा. शिवाजीनगर, बेळगाव) यांच्यासोबत काही जणांचा वाद झाला. त्यातूनच मनवाडकर यांना जमावाने बेदम मारहाण केली.
मालगावातील एका सराईत गुन्हेगारासह सुमारे वीस जणांच्या जमावाने ट्रक रोखून वारकऱ्यांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे वारकऱ्यांत हलकल्लोळ उडाला. ट्रकमधील वृद्ध व महिला वारकरी, बालके भयभीत झाले होते. ट्रकचालक मनवाडकर यांना कुऱ्हाडीचा दांडा व ट्रकवरील झेंड्याची काठी काढून बेदम मारहाण करण्यात आली. त्यात ते गंभीर जखमी झाले.
त्यांना वाचविण्यासाठी आलेले वारकरी परशुराम जाधव व तुरमुरीचे ग्रामपंचायत सदस्य, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते सुरेश राजूरकर यांनादेखील जमावाने बेदम मारहाण केली. जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी वारकरी आले होते. रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल झालेला नव्हता.