आरळा येथील सिध्दार्थनगर येथे अमोल झाडे कुटुंबासह राहतात. त्यांचा निनाईदेवी-दालमिया साखर कारखान्यावर खानावळीचा व्यवसाय आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्यासुमारास ते कुटुंबियांसह खानावळीत गेले होते. दुपारी तीन वाजण्याच्यासुमारास ते विश्रांतीसाठी घरी आले होते. यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. यावेळी घराशेजारी एक अनोळखी व्यक्ती उभी होती. त्याची चौकशी केली असता, त्याने पाणी पिण्यास आल्याचे सांगितले. झाडे यांनी आत जाऊन पाहणी केली असता, पाठीमागील दरवाजाही उघडा होता. पुन्हा त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता ती व्यक्ती पसार झाली होती.
यानंतर झाडे यांनी घरात पाहणी केली असता, तिन्ही कपाटातील कपडे विस्कटल्याचे दिसून आले. तिजोरीतील १८ हजार रुपयांचे पाच ग्रॅम सोन्याचे टॉप्स, १८ हजार रुपयांची गळ्यातील पाच ग्रॅम सोन्याची साखळी, ३० हजार रुपयांच्या पाच ग्रॅम सोन्याच्या दोन अंगठ्या, ३६ हजार ५०० रुपयांचे वीस ग्रॅमचे सोन्याचे गंठण, १८ हजार रुपयांची साडेचार ग्रॅम सोन्याची अंगठी, १८ हजार रुपयांची साडेचार ग्रॅमची सोन्याची अंगठी, २९ हजार रुपयांचा पंधरा ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस असा एकूण एक लाख ६७ हजार ५०० व रोख रक्कम एक लाख २१ हजार २०० असा मुद्देमाल चोरुन नेला.
याबाबतचा गुन्हा कोकरुड पोलिसांत दाखल केला असून, तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदव वाघ करत आहेत.