बुधगाव : बुधगाव (ता. मिरज) येथील निवृत्त शिक्षक तानाजीराव खराडे यांची सून आणि दोन नातींचा मंगळवारी रात्री तासगावजवळ झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ही बातमी कळताच बुधगावात शोककळा पसरली. खराडे गुरुजींचे हसते-खेळते ''अवधूत'' हे निवासस्थान नि:शब्द झाले.तानाजीराव खराडे (गुरुजी) यांना साॅफ्टवेअर इंजिनियर असलेला अवधूत हा मुलगा आणि दोन मुली आहेत. मुलींची लग्ने झाली असून, मुलगा नोकरीनिमित्त पुण्यात राहतो. बुधगावातील घरात गुरुजी व त्यांच्या पत्नी असे दोघेच वास्तव्यास असतात. अवधूत यांचा तासगावातील राजेंद्र जगन्नाथ पाटील यांची मुलगी प्रियांकाशी २०१६ मध्ये विवाह झाला होता. त्यांना ध्रुवी (वय ४ वर्षे) आणि कार्तिकी (वय ७ महिने) अशा दोन गोंडस मुली होत्या. दिवाळी व उन्हाळी सुट्टीसाठी त्या आईसह बुधगावात आल्या की, खराडे गुरुजींचं ''अवधूत'' हे निवासस्थान गोकुळच बनायचं!यंदाही पंधरा दिवसांपूर्वी अवधूत हे पत्नी प्रियांका आणि मुलींना बुधगावात सोडून गेले होते. परवा दिवशी प्रियांका मुलींसह तासगावला माहेरी गेल्या होत्या. कोकळे येथील बहिणीच्या मुलीच्या वाढदिवसाला आईवडिलांसोबत प्रियांकाही मुलींसह गाडीतून गेली होती. परत येताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.
व्हिडीओ कान्फरन्सिंगवर शेवटचा संपर्क..वाढदिवसाच्या कार्यक्रम पाहण्याच्या उद्देशाने अवधूत यांनी पुण्यातूनच रात्री साडेनऊ वाजता व्हिडीओ काॅन्फरन्सिंग काॅल केला. या वेळी कोकळे येथे असणारी पत्नी, मुली आणि बुधगाव येथील आई यांचा एकत्रित संवाद आणि एकमेकांचे दर्शनही झाले. ते शेवटचेच ठरले. बुधवारी बुधगावला येऊन प्रियांका आणि मुली शनिवारी पुण्याला परतणार होत्या. पण काळाने त्यांच्यावर घाला घातला.