मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथील डाॅ. वनमोरे कुटुंबीयांच्या सामूहिक आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी बुधवारी आणखी तिघा सावकारांना अटक केली. आतापर्यंत १८ जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित सात फरारी संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शामगोंडा कलगोंडा पाटील (वय ५४, रा. गाडवे चौक, मिरज), राजेश गणपती होटकर (वय ५४, रा. विद्यानगर, विश्रामबाग) व अण्णासाहेब तात्यासाहेब पाटील (वय ६९, रा. म्हैसाळ) या तिघांना बुधवारी अटक करण्यात आली.
खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून म्हैसाळ येथील पशुवैद्यक तज्ज्ञ डॉ. माणिक वनमोरे व पोपट वनमोरे या दोघा सख्ख्या भावांच्या कुटुंबीयातील तब्बल नऊ जणांनी विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना सापडलेल्या दोन चिठ्ठ्यात वनमोरे बंधूंनी त्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देणाऱ्या २५ खासगी सावकारांची नावे लिहिली आहेत. पोलिसांनी सर्व २५ सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल करुन यापैकी १८ जणांना अटक केली आहे. उर्वरित फरारी आरोपींच्या शोधासाठी परजिल्ह्यासह कर्नाटकात पोलीस पथके पाठविण्यात आली आहेत.
ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदकुमार रामचंद्र पवार, राजेंद्र लक्ष्मण बन्ने, अनिल लक्ष्मण बन्ने, खंडेराव केदारराव शिंदे, डॉ. तात्यासाहेब अण्णाप्पा चौगुले, शैलेंद्र रामचंद्र धुमाळ, प्रकाश कृष्णा पवार, संजय इराप्पा बागडी, अनिल बाळू बोराडे, पांडुरंग श्रीपती घोरपडे, विजय विष्णू सुतार, शिवाजी लक्ष्मण कोरे, रेखा तात्यासाहेब चौगुले, गणेश ज्ञानु बामणे आणि शुभदा मनोहर कांबळे या पंधरा संशयितांना अटक केली हाेती. त्यानंतर बुधवारी शामगोंडा कलगोंडा पाटील, राजेश गणपती होटकर व अण्णासाहेब तात्यासाहेब पाटील या तिघांना अटक करण्यात आली.