कवठेमहांकाळ : गुप्तधन मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी म्हांडूळ जातीच्या सर्पांची तस्करी करणार्या एकाला आज, बुधवारी कवठेमहांकाळ येथे पोलिसांनी छापा टाकून पकडले. संभाजी महादेव व्हनमाने (वय ५०, रा. कवठेमहांकाळ) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून म्हांडूळ जातीचे तीन सर्प जप्त करण्यात आले. जत विभागीय पोलीस अधिकारी पौर्णिमा चौगुले यांच्या पथकाने दुपारी तीनच्या दरम्यान ही कारवाई केली. संभाजी व्हनमाने येथील बेघर वसाहतीमध्ये राहतो. तो मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतो. गुप्तधन प्राप्त करण्यासाठी म्हांडूळ जातीचे सर्प होमहवन करण्याकरिता लागतात व यासाठी म्हांडुळांना मोठी रक्कमही मिळते, अशी माहिती त्याला मिळाली होती. त्यानंतर तो म्हांडुळांच्या शोधात होता. परिसरातून त्याने तीन म्हांडूळ पकडून आणले होते. तो त्यांची विक्री करणार होता. परंतु, तत्पूर्वीच याची माहिती जतच्या पोलीस पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांनी आज सकाळपासूनच कवठेमहांकाळ येथील बेघर वसाहतीमध्ये सापळा रचला होता. दुपारी तीन वाजता संभाजी व्हनमाने त्याच्या घराशेजारच्या बोळात काळ्या रंगाच्या कॅनमध्ये म्हांडुळांना घेऊन थांबला होता. तो व्हनमाने असल्याची खात्री पटताच पथकाने झडप टाकून त्याला पकडले. त्याच्याकडून तांबूस, काळपट रंगाचे तीन म्हांडूळ जातीचे सर्प पोलिसांनी हस्तगत केले. त्याला अटक केली असून, या म्हांडुळांची किंमत सुमारे एक लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत प्रशांत काटकर, राजू शिरोळकर, प्रकाश खोत, पडळकर यांनी सहभाग घेतला. संभाजी व्हनमानेवर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
कवठेमहांकाळमध्ये तीन म्हांडूळ जप्त
By admin | Published: May 22, 2014 12:40 AM