सांगली : येथील वसंतदादा साखर कारखान्याचे प्रशासन कामगार युनियनला हाताशी धरून नियमित कामगारांना ब्रेक देणे, पगार थकित ठेवून वेठीस धरणे, असे प्रकार करत असल्याचा आरोप करीत तीनशेवर कामगारांनी मंगळवारी सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर सहायक कामगार आयुक्तांनी कारखाना प्रशासनास थकित पगार, बेकायदेशीर बे्रक देणे, बैठकीला गैरहजर राहणे याबाबत तीन नोटिसा बजावल्या. दि. १ जुलै रोजी पुन्हा बैठक बोलावली असून, गैरहजर राहिल्यास कारखान्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील, असे आश्वासनही अधिकाऱ्यांनी दिले.कारखान्यातील कामगारांना १ मे २०१५ पासून तीन महिन्यांचा ब्रेक दिला आहे. कारखाना प्रशासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ कामगारांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर दि. १९ जुलैरोजी दुपारी ठिय्या मारला होता. त्यानंतर सहायक आयुक्तांनी, दि. २३ जूनरोजी (मंगळवारी) कारखाना प्रशासन व कामगार युनियनची बैठक बोलावल्याचे जाहीर केले होते. सहायक कामगार आयुक्त नितीन पाटणकर यांनी तशी लेखी नोटीसही दिली होती. मात्र कारखाना प्रशासन व युनियनचा प्रतिनिधी मंगळवारी झालेल्या बैठकीस हजर राहिले नाहीत. तीनशेहून अधिक कामगार आयुक्त कार्यालय परिसरात तीन तास तळ ठोकून होते. कारखाना प्रशासन व युनियनचे प्रतिनिधी नसल्यामुळे बैठकीत कोणतीही ठोस चर्चा झाली नाही. पाटणकर यांनी प्रशासन व युनियनला पुन्हा नोटीस बजावून, बुधवार दि. १ जुलैरोजी बैठकीस हजर राहण्याचे कळविले आहे. त्या बैठकीस ते हजर राहिले नाहीत, तर त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईबरोबरच प्रत्येक कामगाराच्यावतीने न्यायालयात खटला चालविण्यात येईल, असे सांगितले. कारखान्याने कामगारांना डिसेंबर २०१४ पासून पगार दिलेला नाही. कामगार आयुक्तांची परवानगी न घेताच नियमित कामगारांना तीन महिन्यांचा बे्रक दिला आहे. चर्चेला बोलावूनही गैरहजर राहत आहेत. याबद्दल नोटीस बजाविण्यात येईल, असे आश्वासन पाटणकर व कामगार अधिकारी पवनकुमार चव्हाण यांनी कामगारांना दिले. दि. १ जुलैरोजी पुन्हा कारखाना प्रशासन व युनियनबरोबर बैठक ठेवली आहे. या बैठकीस कामगार प्रतिनिधींनाही बोलाविले असून यामध्ये ठोस निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी कामगारांना दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी दिलीप गोरे, डी. आर. कुलकर्णी, अशोक शिंदे, पोपट पाटील, लक्ष्मण शिंदे, नंदू खोत उपस्थित होते. (प्रतिनिधी)कामगार युनियन बरखास्तीचा प्रस्ताववसंतदादा साखर कारखान्यातील कामगार युनियन कामगारांच्या हितापेक्षा प्रशासनाच्या बाजूनेच निर्णय घेत आहे. कामगारांच्या प्रश्नासाठी बोलाविलेल्या बैठकीसही ते हजर राहत नाहीत. त्यामुळे युनियन बरखास्त करण्याची लेखी मागणी पुणे येथील रजिस्ट्रार आॅफ युनियन येथे कामगारांनी केली आहे. युनियन कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी येत नसल्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.
वसंतदादा कारखान्याला तीन नोटिसा
By admin | Published: June 24, 2015 12:12 AM