अविनाश कोळीसांगली : राज्य शासनाने गुरुवारी अधिसूचनेद्वारे राज्यभरातील विविध जिल्ह्यातील अनेक गावांचा नव्याने डोंगरी विभागात समावेश केला आहे. या सर्व गावांतील मुलांना वैद्यकीय शिक्षणाची वाट सुलभ होणार आहे. नियमानुसार त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ३ टक्के आरक्षण देण्यात आले आहे.
एम.बी.बी.एस.च्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डोंगरी विभागातील विद्यार्थ्यांसाठी तीन टक्के समांतर आरक्षण देण्यात आलेले आहे. या जागा संविधानिक आरक्षणानुसार विभागून देण्यात येतात. नव्याने डोंगरी विभागात समाविष्ट झालेल्या गावातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी याचा मोठा फायदा होणार आहे.वैद्यकीय शिक्षणासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होतात. यात स्पर्धा वाढत आहे. अशा स्थितीत समांतर आरक्षणाद्वारे डोंगरी भागातील मुलांना वैद्यकीय शिक्षणाची वाट अन्य विद्यार्थ्यांपेक्षा थोडी सुलभ होणार आहे. त्यामुळे डोंगरी भागात समाविष्ट झालेल्या गावातील मुलांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
आरक्षणासाठी या अटींचे पालन हवेसवलतीचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांचे दहावी किंवा बारावीचे शिक्षण हे त्या डोंगरी गावात किंवा त्या तालुक्यामध्ये झालेले असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याच्या पालकाचा रहिवासी दाखला हा त्या डोंगरी गावाचा असणे आवश्यक आहे.
सांगली जिल्ह्यातील ७१ गावांचा समावेश
सांगली जिल्ह्यातील ७१ गावांचा नव्याने डोंगरी भागात समावेश केला गेला आहे. खानापूर तालुक्यातील ४६, आटपाडी तालुक्यातील २१ तर कडेगाव तालुक्यातील ४ गावांचा समावेश आहे. या गावांना शासनाच्या विविध योजनांसह येथील मुलांना वैद्यकीय शिक्षणासाठी ३ टक्के राखीव जागांचा लाभ होणार आहे.
डोंगरी विभागात समाविष्ट झालेल्या गावांतील विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षणात आरक्षणाचा लाभ मिळविण्यासाठी आपले दहावी किंवा बारावीचे शिक्षण डोंगरी विभागात झाल्याचा दाखला तहसीलदार यांच्याकडून काढून घ्यावा. या बरोबरच पालकांचा त्याच डोंगरी गावाचा रहिवासी दाखला देखील काढून घ्यावा. - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली