सांगली : विटा ते मायणी रस्त्यावरील घानवड गावात पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल विलास खरात (वय २९, रा. दहीवडी, ता. माण, जि. सातारा) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीची तीन पिस्तुले, दहा काडतुसे जप्त केली.नूतन अधीक्षक संदीप घुगे यांनी पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश दिले होते. अधीक्षक घुगे यांच्या सुचनेनुसार गुन्हे अन्वेषणचे पथक कार्यरत होते. उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील हवालदार बिरोबा नरळे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल खरात याच्याकडे पिस्तुले असून तो घानवड गावातील भाग्यनगर फाट्याजवळ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथक तेथे गेले. तेव्हा पाठीला सॅक लावलेला तरूण संशयास्पदरित्या थांबलेला दिसला. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली. तेव्हा सॅकमध्ये देशी बनावटीची तीन पिस्तुले आणि दहा काडतुसे आढळली. हा शस्त्रसाठा तो विक्रीसाठी आल्याचे पोलिस चौकशीत सांगितले. नरळे यांनी त्याच्याविरूदध विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भारतीय शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरात हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी पिस्तुल विक्रीबद्दल गुन्हा दाखल केला आहे. विटा पोलिस पुढील तपास करत आहेत.गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, सागर लवटे, संदीप गुरव, नागेश खरात, दरीबा बंडगर, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, सागर टिंगरे, विक्रम खोत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Sangli: रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून तीन पिस्तुले, दहा काडतुसे जप्त
By घनशाम नवाथे | Published: February 05, 2024 12:09 PM