कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथे बेकायदेशीर खासगी सावकारी करणाऱ्या तिघांविरोधात खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर प्रकाश वगरे, महेश ऊर्फ जगदीश प्रकाश वगरे, प्रकाश कोंडीबा वगरे अशी संशयिताची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
फिर्यादी अक्षय कृष्णा माळी यांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी संशयितांकडून १२ लाख रुपये व्याजाने घेतले होते. मात्र, कागदाेपत्री या तिघांनी १५ लाख दिल्याचे नमूद केले आहे. राहिलेले ३ लाख नंतर देतो, असे त्यांनी फिर्यादीस सांगितले. मात्र, ती रक्कम दिली नाही; मात्र एकूण १५ लाख रुपयांचे व्याज व हप्ता तिघेजण वसूल करीत होते. फिर्यादीने यातील ८ लाख ३ हजार रुपये वेळाेवेळी परत केले आहेत. तरीही त्यांनी पैशासाठी तगादा लावल्यानंतर माळी यांनी ९ लाख रुपये परत केले. एकूण १७ लाख ३ हजार रुपये परत केले आहेत. तरीसुद्धा आणखी सहा लाख रुपयांसाठी ते माळी यास धमकी देत हाेते. ‘पैसे देऊ शकत नसशील तर तुझे शेत आमच्या नावावर कर’ धमकावू लागले. हा त्रास सहन न झाल्याने माळी यांनी कासेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक अविनाश मते यांची भेट घेऊन हा प्रकार सांगितला. त्यांनी तत्काळ गुन्हा नोंद करून आरोपींना अटक केली. त्यांच्यावर बेकायदेशीर खासगी सावकारी, खंडणी, फसवणूक असे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.