सांगली : जिल्हा परिषद शाळेतील सर्वाधिक पटसंख्या आणि चांगली गुणवत्ता असणाºया राज्यातील शंभर शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात येणार आहे. त्यानुसार शाळांची माहिती भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून जिल्ह्यातील कडेगाव, कवठेएकंद (ता. तासगाव) व आरग (ता. मिरज) या तीन शाळांची निवड झाली आहे. या शाळांमध्ये मूलभूत सुविधांसह गुणवत्ता वाढविण्यासाठी स्वतंत्र निधी मिळण्याची शक्यता असल्याचे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकाºयांकडून सांगण्यात आले.
राज्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शंभर शाळा निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा दिला असून, या शाळा उर्वरित ९० शाळांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करणार आहेत. या शाळा अनुक्रमे ‘ओजस’ आणि ‘तेजस’ आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून ओळखल्या जातील. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत शिक्षण विभागाने राज्यात शंभर शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याचा निर्णय मागीलवर्षी घेतला होता. त्यानुसार काही दिवसांपासून या शाळांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. तेजस शाळांसाठी सर्व महापालिका क्षेत्रातून प्रत्येकी १ व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील किमान २ शाळांची निवड करण्यात येणार होती.
आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागाच्या प्रत्येकी २ शाळांची निवड केली जाणार होती. त्यानुसार शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची बैठक झाली आहे. या समितीने सांगली जिल्ह्यातील आरग (ता. मिरज), कवठेएकंद (ता. तासगाव) आणि कडेगाव येथील जिल्हा परिषद शाळांची निवड केली आहे. या सर्व शाळांची गुणवत्ता चांगली असल्यामुळे पहिली ते आठवीपर्यंत शाळेतील पटसंख्या चारशेहून अधिक आहे. यामुळेच या शाळांची आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा म्हणून निवड झाली आहे. या शाळांना केंद्र आणि राज्य शासनाकडून स्वतंत्र निधी मिळणार असून अभ्यासक्रमही वेगळा असण्याची शक्यता आहे. मार्च २०२१ आणि २०२२ मध्ये विविध आंतरराष्ट्रीय चाचण्यांना या शाळांना सामोरे जावे लागणार असल्याचेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.