शीतल पाटीललोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राज्य शासनाने महापालिकेच्या निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचना लागू केल्याने सांगलीतील वॉर्डाची रचना पुन्हा बदलणार आहे. सध्या चार सदस्यीय प्रभाग आहेत. नव्या रचनेत २० ऐवजी २६ वॉर्ड होतील. यामुळे इच्छुक उमेदवारांची झोप उडाली असून त्यांच्या निवडणूक तयारीवरही पाणी फिरले आहे.
महापालिकेच्या निवडणुकीला अजून दोन वर्षांचा कालावधी आहे. निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. आतापर्यंत दोनदा एकसदस्यीय, दोनदा द्विसदस्यीय तर एकदा त्रिसदस्यीय व सध्या चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका झाल्या आहेत. सांगलीत त्रिसदस्यीय प्रभाग रचना २००३-०४ च्या निवडणुकीत होती. आता पुन्हा तीच प्रभाग पद्धती लागू होणार आहे. सध्या इच्छुकांनी एकमेकांशी साटेलोटे करीत निवडणुकीची तयारी सुरू केली होती. त्यांना नव्याने राजकीय समीकरणे जुळवावी लागणार आहेत.
चौकट
पालिकेतील सध्याची स्थिती
सध्या महापालिकेचे २० वॉर्ड असून, नगरसेवकांची संख्या ७८ आहे. चारसदस्यीय १८ वॉर्ड आहेत, तर दोन वॉर्डात तीन नगरसेवक आहेत. जवळपास २२ ते २५ मतदारांचा एक प्रभाग आहे.
चौकट
आता अशी असेल पालिकेतील स्थिती
शासनाच्या नव्या नियमामुळे महापालिकेच्या सध्या २० वॉर्डाऐवजी २६ वॉर्ड होतील. नगरसेवकांच्या संख्येत कोणताही बदल होणार नाही. १५ ते १८ हजार मतदारसंख्येचे वॉर्ड असतील. त्यात आरक्षित व खुल्या वर्गाच्या जागांनुसार नवीन रचना करावी लागणार आहे.
चौकट
एका मतदाराला तिघांना द्यावे लागणार मत
तीन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत एका मतदाराला चार मते द्यावी लागली होती. त्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका होत्या. आता चारऐवजी तिघांना मतदान करावे लागणार आहे. यापूर्वीही शहरातील मतदारांनी तीन व चार जणांना मतदान केले आहे.
चौकट
राजकीय अपेक्षांवरही पाणी
१. सध्याची बहुसदस्यीय प्रभाग रचना योग्य होती. शासनाने त्रिसदस्यीय रचना करून काय साध्य केले? या मागे काहीच लाॅजिक नाही. केवळ महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी हा उद्योग केला आहे.
- दीपक शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप
२. बहुसदस्यीय रचनेत विकासावर परिणाम होतो. त्यासाठी एक अथवा द्विसदस्यीय प्रभाग रचनाच योग्य आहे. त्यामुळे जनतेला न्याय देता येईल.
- पृथ्वीराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस
३. राज्य शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. जनतेच्या विकासाच्या दृष्टीने त्रिसदस्यीय रचना चांगली आहे. त्यामुळे शहराचा विकासाला गती येईल. - संजय विभुते, जिल्हाप्रमुख शिवसेना
४. सांगलीत यापूर्वीही त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे शहराच्या विकासावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. कार्यकर्त्यांनाही योग्य न्याय देता येईल.
- संजय बजाज, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी