सांगली : मिरज परिसरात घरफोडी, दुचाकी चोरीसह अन्य गुन्हे करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. अनिस अल्ताफ सौदागर (वय २६, रा. सुभाषनगर), वसीम अल्लाबक्ष मुल्ला (३३, संजय गांधी नगर झोपडपट्टी, मिरज) आणि गणेश विष्णू माने (२५, मूळ रा. फुटका घाण्याजवळ, सावर्डे, सध्या भारतनगर,मिरज) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणत १ लाख ४४ हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.जिल्ह्यातील घरफोडी, चोरी, जबरी चोरीतील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी एलसीबीचे पथक मिरज परिसरात गस्तीवर होते. यावेळी पथकाला माहिती मिळाली की, स्टेशन परिसरात पायवाटेजवळ तिघे संशयित थांबले आहेत. त्यानुसार पथकाने जात चौकशी केली असता, तिघांनाही समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. यानंतर त्यांच्याकडील दुचाकी आणि सिलींडरबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी चोऱ्यांची कबुली दिली.यात त्यांनी मिरज-म्हैसाळ रस्त्यावरून दुचाकी चोरल्याचे सांगितले तर दुसरी दुचाकी सुभाषनगर येथील एका घरासमोरून चोरल्याचे सांगितले. यासह मालगाव रोडवरील एका घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील कानातील टॉप्स, कानातील साखळीसह मेकला, चांदीचे ब्रेसलेट, पायातील पैंजण आणि दोन गॅस सिलींडर चोरल्याची कबुली दिली. मिरज ग्रामीण पोलिसांकडे या सर्व गुन्ह्यांची नोंदही आढळली.संशयितांकडून एक घरफोडी, दोन दुचाकी चोरी, एक मोबाईल चोरी असे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. एलसीबीचे निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे, संदीप पाटील, राहूल जाधव, संकेत मगदूम आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
मिरज परिसरात चोऱ्या करणारे तिघे सराईत जेरबंद, दीड लाखांचा माल जप्त; एलसीबीची कारवाई
By शरद जाधव | Published: May 06, 2023 6:20 PM