सावंतपूर : कुंडल फाटा (ता. पलूस) येथे बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे तीन ट्रक पकडण्यात आले. वाळू वाहतूकविरोधी पथकाने ही कारवाई केली. बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कायदेशीर, दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार निवास ढाणे यांनी सांगितले.
१ जानेवारीपासून त्यांनी वाळू उपसा व वाहतुकीविरुद्ध पथक तयार करून पलूस तालुक्यात कारवाई सुरू केली आहे. तहसीलदार ढाणे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मध्यरात्री मंडल अधिकारी ए. डी. लोहार, तलाठी बाबूराव जाधव व तलाठी सचिन कांबळे यांच्या पथकाने कुंडल फाटा येथे विटा येथून इस्लामपूरच्या दिशेने निघालेले वाळूचे तीन ट्रक पकडले आहेत. ट्रकचालक व ट्रक ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांच्यावर कायदेशीर, दंडात्मक कारवाई केली जाईल, असे तहसीलदारांनी सांगितले.