बनेवाडी येथील माळी वस्तीवर श्रीरंग माळी यांचे कुटुंब राहाते. श्रीरंग माळी सायंकाळी तेजस आणि संकेत (वय ५) या दोन मुलांसह वस्तीजवळच्या मळ्यात गेले होते. ट्रॅक्टर विहिरीसमोर लावल्यानंतर मुलांना ट्रॅक्टरवरच पुढे बसवून माळी उतरून मळ्यात गेले. ट्रॅक्टरला चावी तशीच होती. तो गियरमध्ये होता. दोघांपैकी एका मुलाचा क्लचवर पाय पडल्याने ट्रॅक्टर उताराने पुढे जाऊ लागला. मोठा भाऊ संकेत याने कशीबशी उडी मारली. तो खाली पडला. त्याला किरकोळ जखम झाली, परंतु लहान तेजसला उडी मारता आली नाही. ट्रॅक्टर पुढे जाऊन तेजससह विहिरीत पडला. श्रीरंग माळी यांनी ते लांबून पाहिले, परंतु तेजसला वाचवण्यात त्यांना यश आले नाही. त्यांनी आरडाओरडा केल्यावर घटनास्थळी गर्दी झाली.
विहिरीत खूप पाणी असल्याने ट्रॅक्टर व तेजस खोलवर गेले होते. रात्री उशिरापर्यंत मोटारीने पाणी उपसा करण्यात आला. रात्री उशिरा तेजसला बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. सहायक निरीक्षक राहुल कोलंबीकर, उपनिरीक्षक अजय ठिकने, हवालदार सुभाष पडळकर, आलम फकीर, सयाजी पाटील यांनी तेजसला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.
त्याच्या आई, वडील आणि कुटुंबाचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.