सांगली : येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मंगळवारी एका विचित्र भानामती प्रकरणाचा भांडाफोड केला. सांगलीतील एका तीन वर्षीय बालकाची अघोरी प्रकारामधून सुटका केली. एका मनोविकारग्रस्ताकडून हे प्रकार सुरू होते. भानामतीचा हा प्रकार असल्याचे समजून बालकाच्या कुटुंबाने यातून सुटका व्हावी म्हणून आतापर्यंत लाखो रुपये खर्च केले आहेत.बालकाच्या अंगावर अचानक चटणी पावडर पडायची, बालकाच्या गुदद्वारास चटणीचा लेप लागायचा. पाठीवर ओरखडे उठायचे. दारात हळद-कुंकू, लिंबू-मिरची, करणीची परडी, मुलाच्या कपड्यांची बाहुली पडायची. बाहुलीवर सुई टोचून मुलाचा व आई-वडिलांचा फोटो लावलेला असे. तसेच गेल्या आठवड्यात मुलाच्या आईच्या हातावर अचानक ओरखडे उठले होते. गेल्या दीड वर्षापासून हा सर्व प्रकार सुरू होता. त्यामुळे हे कुटुंब भयभीत झाले होते.या कुटुंबाच्या एका नातेवाइकाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीला भेटण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कुटुंबाने सांगलीत अंनिसच्या कार्यालयात संपर्क साधला. अंनिसने या भानामतीचा शोध घेण्याचा निश्चय केला. प्रा. प. रा. आर्डे, डॉ. संजय निटवे, राहुल थोरात, शशिकांत सुतार व मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजकिरण साळुंखे यांनी त्या कुटुंबीयांच्या सदस्यांची एकत्र बैठक घेतली. या घटनाक्रमाबाबत प्रत्येक सदस्याशी संवाद साधला. त्यांच्याकडून मिळालेल्या घटनाक्रमावरून अंनिसला त्याच कुटुंबातील एक संशयित व्यक्ती सापडली. ही व्यक्ती मनोविकाराने ग्रस्त होती. त्याच्याकडून हे सर्व प्रकार केले जात होते. डॉ. राजकिरण साळुंखे यांनी या व्यक्तीवर मोफत औषधोपचार सुरू केले आहेत. तसेच त्याला समज दिली आहे. त्यामुळे दीड वर्षापासून सुरू असलेल्या या अघोरी प्रकाराला पूर्णविराम मिळाला आहे.कुटुंबाने मानले आभारअघोरी भानामतीमधून सुटका होण्यासाठी कुटुंबाने देव-देवऋषी केले. संकेश्वरच्या एका बुवाने तर ही भानामती काढण्यासाठी दीड लाख दक्षिणा वसूल केली; पणकाहीच फरक पडला नाही. लाखो रुपये खर्च करूनही हे विचित्र प्रकार थांबतनव्हते. या कुटुंबाने यातून सुटका करणाऱ्या अंनिसचे आभार मानले. याकामी अंनिसचे कार्यकर्ते चंद्रकांत वंजाळे, आशा धनाले, त्रिशला शहा, अण्णा गेजगे यांची मदत मिळाली.
अघोरी ‘भानामती’मधून तीन वर्षीय बालकाची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 11:55 PM