सांगली : मिरज तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली. नीलेश तानाजी भोसले (वय २९) असे संशयिताचे नाव आहे. जादा सहजिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी काम पाहिले.खटल्याची अधिक माहिती अशी की, २०२१ मध्ये हा गुन्हा घडला होता. आरोपी भोसले याने अल्पवयीन मुलास घरातून बोलावून घेत लैंगिक हेतूने त्याच्याशी वर्तन केले होते. यानंतर त्याने अल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य केले होते. त्या पीडितेच्या आईने मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.सहायक पोलिस निरीक्षक पी. सी. बाबर यांनी या प्रकरणाचा तपास केला. घटनास्थळाचा पंचनामा, पीडित मुलगा, त्याचे आई-वडील यांचे जबाब नोंदविण्यात आले व त्यानंतर भोसले याच्याविरोधात जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. शिक्षेच्या मुद्यावर सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना अल्पवयीन मुलावर अत्याचार करण्यात आल्याने कोणतीही सहानुभूती न दाखवता जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती केली होती.यानंतर न्यायालयाने आरोपीला तीन वर्षांची शिक्षा सुनावली. या खटल्यात मिरज ग्रामीणचे कर्मचारी श्यामकुमार साळुंखे, पैरवी कक्षातील रेखा खोत यांचे सहकार्य मिळाले.
अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्यास तीन वर्षांची शिक्षा, सांगली जिल्हा न्यायालयाचा निकाल
By शरद जाधव | Published: October 13, 2023 7:00 PM