युनूस शेखइस्लामपूर : पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील पेठ (ता.वाळवा, जि. सांगली) गावच्या हद्दीतील तीळगंगा ओढ्याच्या पात्रावरील पुलाजवळ आज, शुक्रवारी भर दुपारी रणरणत्या उन्हात मुंबईकडे जाणाऱ्या कारने पेट घेतला. ही आग आटोक्यात आणण्यापूर्वीच आगीत कार जळुन खाक झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी हा थरार जवळून अनुभवला. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सतर्कता दाखवत ही आग पूर्णपणे विझवली.पालघर जिल्ह्यातील भुईसर येथील मंजुळा मल्हारी म्हेत्रे यांच्या मालकीची ही कार (एम एच ०२ सी डब्ल्यू १९०८) आहे. ते कोल्हापूरहून कराडच्या दिशेने निघाले होती. पेठ येथील उड्डाण पुलावरून येताना चालकास कारच्या समोरील बाजूतून धूर येत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्याने प्रसंगावधान राखत कारचा वेग कमी करुन एकाबाजूस घेतली. कारमधील सर्वजण खाली उतरले. त्यांनी सर्व साहित्यसुद्धा बाहेर घेतले. त्यानंतर हळूहळू आग लागून धुराचे लोट बाहेर पडू लागले. दुपारच्या रणरणत्या उन्हाचा तडाखा आणि वाऱ्याची झुळक यामुळे आग वाढत गेली.महामार्गावर कारने पेट घेतल्याचे दिसताच या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरक्षीत राहील याची दक्षता घेतली होती. काही वेळात पालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब दाखल झाला. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. संपूर्ण कार आगीच्या ज्वालानी वेढलेली होती. जवान दिलीप कुंभार, किरण पाटील, अनिल मदने आणि पांडुरंग कलगुटगी यांनी आग आटोक्यात आणली. या आगीत कारचे मोठे नुकसान झाले.
पुणे-बेंगळुरु महामार्गावरील पेठ येथे बर्निंग कारचा थरार, कार जळून खाक
By श्रीनिवास नागे | Published: April 07, 2023 4:15 PM