सूत व कापूस व्यापारात आंतरराष्ट्रीय बलाढ्य कंपन्यांचा प्रवेश व साठेबाजीमुळे यंत्रमाग व्यवसाय अडचणीत सापडला असून यात शासनाने लक्ष घालावे व यंत्रमाग लघुउद्योगाची साखळी पूर्ववत सुरू ठेवावी, यासाठी विटा शहरातील यंत्रमागधारकांनी व्यवसाय दि. २६ जानेवारीपासून १५ दिवस पूर्णपणे बंद ठेवला होता. गेल्या महिनाभरात सूत बाजारात झालेली दीडपट दरवाढ व आता त्यापाठोपाठ दररोज दर घसरणीमुळे यंत्रमाग व्यवसायास जुगाराचे स्वरूप आल्याची तक्रार होती.
दिवाळीच्या दरम्यान ३२ काऊंटच्या सुताचे दर १८० रु. किलो होते, तर कापसाचे दर ४१ हजार प्रति खंडी स्थिर होते. त्यानंतर अचानक सूतदरात दररोज ५ ते १० रुपयांची वाढ करण्यात येऊ लागली व महिन्याभरात हे दर दीडपट वाढून २७० रुपयांपर्यंत गेले. मात्र, या तुलनेत कापडास वाढीव दर नव्हता. हा प्रकार नुकसानीचा असल्याचे सांगत यंत्रमागधारकांनी व्यवसाय बंद ठेवला होता.
परंतु याबाबत शासनाकडून कोणताही ठोस निर्णय झाला नाही. १५ दिवसांपासून यंत्रमाग बंद राहिल्याने कामगारांच्या रोजी-रोटीचा प्रश्नही गंभीर बनत चालला होता. त्यामुळे यंत्रमागधारकांनी शहरातील यंत्रमाग व्यवसाय पुन्हा सुरू केले आहेत.
फोटो - यंत्रमागाचा घेणे.