सांगली : कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याने एकीकडे व्यवहार सुरळीत होत असतानाच, आता सर्वत्र सणासुदीची लगबग सुरू झाली आहे. बाजारपेठेत असलेल्या उत्साही वातावरणाचा पुरेपूर फायदा घेत चोरट्यांनीही आता हात मारायला सुरुवात केली आहे. ऐन गणेश चतुर्थीदिवशी शहरातील विविध भागात १५ हून अधिक मोबाईल चोरट्यांनी लांबविले, तर बंद घर फोडून साडे सहा लाखांच्या चोरीचाही प्रकार याच कालावधीत घडल्याने सणासुदीची गडबड असतानाही खबरदारी घेण्याची वेळ आली आहे.
शुक्रवारी मोठ्या उत्साहात गणरायाचे घरोघरी आगमन झाले असलेतरी याच दिवशी चोरट्यांनीही मिळेल त्या वस्तूवर डल्ला मारला. शुक्रवारी केवळ एका दिवसात विश्रामबाग, मारुती रोड, बाजारपेठ परिसरातून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे मोबाईल लंपास झाल्याच्या फिर्यादी दाखल झाल्या आहेत. यासह अजून चोऱ्या झाल्याची शक्यता असून त्याचीही नोंदीची प्रक्रिया सुरूच आहे.
दोन लाखांच्या मोबाईल चोरीनंतर अगदी वर्दळीच्या जामवाडी परिसरातही बंद घर फोडून चोरट्यांनी तब्बल सहा लाख ६६ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले.
गणेशोत्सवानंतर सुरू होणाऱ्या सणांमुळे किमान दोन महिने बाजारपेठेत नेहमीच उत्साहाचे वातावरण असते. दिवाळीपर्यंत हेच वातावरण कायम राहत असल्याने चोरट्यांच्या कारवायाही वाढणार आहेत. त्यामुळे आता नागरिकांनीही या कालावधीत बाजारपेठेत, गर्दीत विशेष खबरदारी घेतल्यास चोरीच्या प्रकाराला आळा बसणार आहे.
चौकट
गर्दीत मोबाईल संभाळा
कोरोनाविषयक लागू करण्यात आलेल्या निर्बंधात शिथिलता देण्यात आल्याने आता बाजारपेठ व संपूर्ण व्यवहार पूर्णवेळ सुरू झाले आहेत. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ सुरू असतात. बऱ्याच कालावधीनंतर व्यवहार पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने नागरिकही खरेदीसाठी बाहेर पडत असले तरी नेमके याचवेळी चोरट्यांचे ते लक्ष्य ठरत आहेत.