शहर पोलीस ठाण्यापासून मुख्य टपाल कार्यालयापर्यंत रस्त्यातच बेकायदा रिक्षा लावून वाहतुकीची कोंडी केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरभरात वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून बेकायदा रिक्षा थांबे निर्माण झाले आहेत. खुद्द शहर पोलीस ठाणे आणि न्यायालयासमोरच अस्ताव्यस्त लावलेल्या रिक्षा वाहतुकीची कोंडी करत आहेत. वारंवार तक्रारी होऊनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
शहरात नव्याने निर्माण झालेले थांबे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. मुख्य टपाल कार्यालयासमोर भररस्त्यातच रिक्षा थांबविल्या जात आहेत. प्रवासी घेण्याच्या स्पर्धेत अन्य वाहनांची पर्वा न करता दिवसभर धिंगाणा सुरू असतो. वाहतूक पोलिसांच्या डोळ्यादेखतच वाहतुकीची कोंडी केली जाते. शनिवारी सकाळपासून शहर पोलीस ठाण्यासमोर भारती विद्यापीठाच्या दारात रिक्षाचालकांचा धिंगाणा सुरू होता. रिक्षा आडव्या लावल्याने प्रतापसिंह उद्यानापर्यंत वाहनांची रांग लागली होती. बसस्थानकासमोर बापट शाळेजवळही वाहतुकीची कोंडी करत रिक्षा लावल्या जात आहेत.
वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांना ही हेतूपुरस्सर केली जाणारी कोंडी दिसत नाही काय? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. काहीतरी देणेघेणे करून रिक्षांना सवलत दिली जात आहे काय, अशीही विचारणा होत आहे.
चौकट
न्यायालयासमोरच थांबा
विजयनगरमध्ये न्यायालयासमोरच सहाआसनी रिक्षाचालकांनी बेकायदा थांबा निर्माण केला आहे. नो- पार्किंगच्या फलकाखालीच रिक्षा लावल्या जातात. विशेष म्हणजे येथे सिग्नल असतानाही रिक्षा रस्त्यातच थांबविल्या जातात. ड्युटीवर असणारे वाहतूक पोलीस रिक्षाचालकांशी दिवसभर गप्पा मारत थांबलेले पाहायला मिळतात.
---------